62 टोलेजंग इमारतींना घरफाळाच नसल्याचे स्पष्ट; करबुडव्यांना 20 वर्षापासूनचा घरफाळा भरावा लागणार
कोल्हापूर विनोद सावंत
महापालिकेच्या घरफाळा विभागाने सुरू केलेल्या रिव्हीजनमुळे (मिळकतींची फेरतपासणी करणे) घरफाळा बुडव्यांचे पितळ उघडे पडत आहे. केवळ 522 मिळकतींच्या सर्व्हेत 156 मिळकतधारकांनी घरफाळा बुडविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 62 टोलेजंग इमारतींना घरफाळाच नसल्याच्sा या तपासणीत उघड झाले आहे. मनपाने रिव्हीजन सुरू केल्यामुळे कर बुडव्यांचा पर्दापाश होत आहे.
महापालिकेचे जकात, एलबीटी बंद झाल्यानंतर घरफाळा हे उत्पन्नाचे मुख्यस्त्राsत झाले आहे. शासनाकडून जीएसटीचे अनुदान वेळेवर मिळत नाही. तसेच मिळणारे अनुदानही जकातच्या तुलनेने कमीच आहे. त्यामुळे घरफाळ्याच्या उत्पन्नावरच महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार आणि विकासकामे अवलंबून आहेत. यामुळेच मनपाने घरफाळा वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सवलत योजनेमुळे वसुली होत आहे. परंतू काहींनी इमारत बांधली पण घरफाळा भरत नाहीत. काहींनी वाढीव बांधकाम केले मात्र, त्याची नोंद घरफाळा विभागाकडे केलेली नाही. तर काहींनी कुळ वापर असताना मालक वापर दाखवून (चेंज ऑफ व्ह्यू) घरफाळा कमी लावून घेतला आहे. मनपाने 20 वर्ष रिव्हीजन केले नसल्यामुळेच अशा कर बुडव्यांचे फावले आहे. आता मात्र, घरफाळा विभागाने कर बुडव्यांचा पर्दापाश करण्यासाठी कंबर कसली असून 7 जूनपासून रिव्हीजनला सुरवात केली आहे. रिव्हीजनसाठी घरफाळा विभागाने सध्या 50 कर्मचारी नियुक्त केले आहेत. यामध्ये 21 पथके, 4 कर अधीक्षक व 4 संगणक चालकांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या पथकाच्या तपासणीत 30 टक्के मिळकतधारकांनी कर बुडविल्याचे समोर आले आहे.
…तर दीड लाख मिळकतींचे चित्र होणार स्पष्ट
केवळ 522 मिळकतींच्या सर्व्हेत 157 मिळकतधारक कर बुडवणारे आढळून आले. मनपाकडे सध्या दीड लाख मिळकतींची नोंद आहे. या मिळकतींसह संपूर्ण शहराचा सर्व्हे झाल्यानंतर किती करबुडवे आहेत, हे समोर येणार आहे.
किमान 20 कोटींच्या उत्पन्नात वाढ
सध्याच्या सर्व्हेनुसार 30 टक्के मिळकतधारकांकडून घरफाळ्यातून महापालिकेची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यानुसार जर संपूर्ण शहरातील सर्व्हे झाला तर किमान 15 हजार मिळकती कर नसलेल्या आढळून येतील. त्यातून मनपाचे वर्षाला किमान 20 कोटींने उत्पन्न वाढेल, असा अंदाज आहे.
सध्याची स्थिती
एकूण मिळकती – 1 लाख 57 हजार 547
रहिवाशी मिळकती – 1 लाख 22 हजार 500
व्यावसायिक मिळकती – 35 हजार 47
रिव्हीजनसाठी नेमलेले पथके
विभागीय कार्यालय पथके कर्मचारी
गांधी मैदान विभागीय कार्यालय 5 10
शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय 4 8
राजारामपुरी विभागीय कार्यालय 6 12
कावळा नाका विभागीय कार्यालय 6 12
घरफाळा बुडव्यांचे धाबे दणाणले
ज्या कर बुडव्यांकडे बांधकाम परवानगी नसेल त्यांना 20 वर्षापासूनचा घरफाळा जमा करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल. त्यांची बांधकाम परवानगी जेव्हा दिली तेव्हापासूनचा घरफाळा लागू केला जाणार असल्याची माहिती घरफाळा विभागातील सुत्रांनी दिली आहे. यामुळे घरफाळा बुडविणाऱ्यांचे धाबे दाणाणले आहेत.