युवराज भित्तम / म्हासुर्ली
राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या दुर्गम व शेकडो वर्षापासून पाणी टंचाईने होरपळणाऱ्या धामणी खोऱ्यातील अनेक गावात शासनाच्या माध्यमातून ‘जल जीवन मिशन’ योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहेत. मात्र सदर योजनांना पाणीपुरवठा करणारी जल स्तोत्रेच फेबुवारी महिन्यापासून कोरडी पडणार आहेत. त्यामुळे धामणी खोऱ्यातील जनतेला कडक उन्हाळ्यात प्रती व्यक्ती ५५ लिटर पाणी कसे उपल्बध होणार.याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला असून कोठ्यावधी रुपये खर्चाच्या सदर नळ पाणी योजनांतून नेमके कोणाला ‘जीवन’ मिळणार.? यामागे कोणता ‘अर्थ’ लपला आहे.असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाल किल्ल्यावरून जल जीवन मिशन योजनेची घोषणा केली. त्यामुळे ‘हर घर जल’ या संकल्पनेतून भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील ग्रामीण कुटुंबांना थेट नळ कनेक्शन द्वारे पुरेस आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.यातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे.
जल जीवन मिशन’ योजनेचा मुख्य उद्देश जरी चांगला असला तरी शेकडो वर्षापासून पाणीटंचाईने ग्रासलेल्या धामणी नदीच्या खोऱ्यात सदर योजनेबाबत अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.धामणी नदीवर पाटबंधारे प्रकल्पच नसल्याने ऐन उन्हाळ्यात नदी चार – पाच महिने कोरडी पडते.तर डोंगरदऱ्यातील नैसर्गिक पाण्याचे झरे पण आटल्या वर डोंगर माथ्यावरील जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
सध्या धामणी खोऱ्यातील काही गावात जल जीवन योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे सुरु असून काही ठिकाणी कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची चर्चा होत आहे.त्यामुळे योजनाच्या भविष्याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.
पाण्यासारखा पैसा खर्च..!
धामणी खोऱ्यात गेल्या काही वर्षापासून शासनाच्या विविध योजना मधून अनेक गावात पाण्यासारखे कोट्यावधी रुपये निधी खर्च करून नळपाणी योजना कार्यान्वित केल्या आहेत.या योजना सध्या कार्यरत असतानाच मात्र नवीन योजनेची कामे सुरु झाल्याने ग्रामस्थां उलट सुलट चर्चानां ऊत आला आहे.
नदीच कोरडी तर, विहिरीत कोठून येणार पाणी..!
काही गावांना थेट धामणी नदी काठावरील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो.मात्र उन्हाळ्यात नदी कोरडी पडल्यावर आपोआप सदर योजनेंच्या विहिरी पण तळ गाठतात व जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.अशाच कमी उपल्बध पाण्याच्या विहिरी वरती सध्या जल जीवन योजनेची कामे सुरू असल्याने जनेतेतून संताप व्यक्त होत आहे.
रस्ते खुदाई धोकादायक..!
पाणी योजनेच्या नळ व चावी कनेक्शन बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या मालकी बरोबरच गावातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आल्याने रस्ते धोकादायक बनले असून वाहने घसरून लहान मोठे अपघात होत आहेत. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे.
धामणी खोऱ्यातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत काही गावांमध्ये ही योजना सुरू आहे.मात्र काही ठेकेदारांनी चुकीची कामे केली आहेत.तर विनापरवाना रस्ते खुदाई करणे,जुन्या जलस्रोतांची तात्पुरती डागडुजी करणे या मार्गांनी योजना गुंडाळण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे.त्यामुळे योजनेचा मुख्य उद्देश बाजूला राहिल्याने या कामी नेमलेले संबंधित अधिकारी नेमके करतात काय? कामात योग्य त्या सुधारणा झाल्या नाहीत संघटनेच्यावतीने आंदोलन केले जाईल.
– संभाजी पाटील- तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड









