मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : पणजीतील आझाद मैदानावर क्रांतिदिन साजरा
पणजी : कुंकळ्ळी बंडाचा इतिहास पाठ्यापुस्तकांमध्ये समावेश करण्याचे दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले असून आता येत्या शैक्षणिक वर्षापासून गोवा क्रांती दिनाचा इतिहास इयत्ता 11 वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. त्याचबरोबर पुढील क्रांती दिनापूर्वी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पणजीतील आझाद मैदानावर आयोजित क्रांतीदिनाच्या प्रमुख कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुऊदास कुंदे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक, वरिष्ठ सरकारी अधिकारी व नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘क्रांती दिन हा गोवा स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा होता. त्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. हा काळ स्वातंत्र्यसैनिकांच्या परमोच्च बलिदानाचा साक्षिदार होता. पुष्कळांनी हौतात्म्य पत्करले त्यामुळे आम्ही मुक्तीचा श्वास घेऊ शकलो. अशाप्रकारे कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करूया, तसेच राज्याला अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी स्वत:ला झोकून देऊया, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची योजना 1 मार्च 2021 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत म्हणजेच आणखी एका वर्षाने वाढवण्यात आली आहे. सरकार लवकरच रिक्त पदे भरण्यास सुऊवात करेल तेव्हा प्रत्येक खात्यात चार टक्के नोकऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वास्तुंचे पावित्र्य जपले पाहिजे : कुंदे
यावेळी बोलताना स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुऊदास कुंदे यांनी, आमच्याकडे मते नाहीत म्हणून आम्हाला दूर करू नका असे सांगताना, आम्ही केवळ 15 ते 20 स्वातंत्र्यसैनिक जिवंत आहोत. त्यामुळे आमची मते नसतील, पण आमची तत्त्वे कायम आहेत, अशा शब्दात सरकारवर टीका केली. राज्यातील आग्वाद सारखे किल्ले वा अन्य ऐतिहासिक महत्वाच्या वास्तुंचा सध्या चाललेला गैरवापर हा निषेधार्ह आहे. ही करमणुकीची ठिकाणे नव्हेत. सरकारने त्यांचे पावित्र्य राखले पाहिजे. तेथे हॉटेल वा मद्यालये थाटण्यास परवानगी देणे म्हणजे राज्याच्या मुक्तीसाठी त्याग आणि प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, असेही कुंदे पुढे म्हणाले. क्रांतीदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मडगावात आयोजित करण्यात यावा, कारण तेथूनच क्रांतीची सुरूवात झाली होती, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे. पणजीत आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना श्री. कुंदे यांनी मांडलेल्या व्यथा व समस्या ऐकून आपणाला धक्का बसल्याचे आलेमाव म्हणाले. त्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षभरात त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे, ही समाधानाची गोष्ट असल्याचे ते पुढे म्हणाले.









