पाऊस लांबणीवर, पिके लागली कोमेजू, शेतकरी चिंतेत : आठवड्यात पाऊस पडण्याची गरज
बेळगाव : पाऊस लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. विशेषत: ऊस, भाजीपाला, हळद यासह फळबागायतींना फटका बसू लागला आहे. शिवारातील कूपनलिका, विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला देखील सुकू लागल्याने किरकोळ बाजारात दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण होऊ लागले आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास आणखी भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. पावसाला सुरुवातच झाली नसल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडे पडू लागले आहेत. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. जिल्ह्यात ऊस, हळद, लिंबू, डाळिंब, द्राक्षे, केळी आणि भाजीपाला पाण्याविना सुकू लागला आहे. गोकाक, मुडलगी, अथणी, चिकोडी, कागवाड, हुक्केरी, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती आदी ठिकाणी ऊस, मका, द्राक्षे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पिकांना फटका बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत येऊ लागले आहेत.
पाणी असलेल्या पिकांना धोका नाही
जिल्ह्यात पावसाविना शेतीपिकांना फटका बसू लागला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पिकांना कोणताही धोका नाही. पावसाला सुरुवात होईल, त्यानंतर पुन्हा पिके जोमाने येतील.
– राजशेखर विजापूर (सहसंचालक कृषी खाते)
विविध पिकांचे क्षेत्र
- पिके क्षेत्र (हेक्टरात)
- ऊस 3 लाख 20 हजार 450
- मका 1 लाख 28 हजार 564
- द्राक्षे 5 हजार 200
- केळी 4 हजार 900
- भाजीपाला 39 हजार
- हळद 6 हजार 700
- मिरची 7 हजार 500
- इतर 2 लाख 40 हजार 657









