ओल्या-सुक्या चाऱ्याचा तुटवडा : पशुपालक चिंतेत, चारा छावण्यांची गरज
बेळगाव : पाऊस लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. ओला व सुक्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाने चारा छावण्या निर्माण कराव्यात, अशी मागणी पशुपालकांतून होऊ लागली आहे. पाण्याविना ही परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या असून त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या, गाढव, कुत्रा, घोडा, ससे आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्याची गरज आहे. मात्र, वळिवाने दगा दिला आहे. शिवाय मान्सूनदेखील लांबणीवर पडला आहे. त्यामुळे चाऱ्याचे संकट ओढवले आहे. पावसाअभावी नवीन ओला चारा निर्माण झाला नाही. त्यामुळे जनावरांना खायला काय घालावे, असा प्रश्नदेखील पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. नदी, तलाव, नाले कोरडे पडू लागल्याने जनावरांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर, गोकाक, मुडलगी, रायबाग, चिकोडी, कागवाड आदी तालुक्यांमध्ये चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चाऱ्याच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. काही ठिकाणी सुक्या चाऱ्याची किंमत 5 ते 6 हजार रुपये प्रतिटन झाली आहे. जिल्ह्यात 19 लाख 10 हजार 496 मेट्रिक टन चारासाठा शिल्लक असल्याचा दावा पशुसंगोपनने केला होता. मात्र, पावसाअभावी काही भागांमध्ये चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुक्या चाऱ्याबरोबर ओल्या चाऱ्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुखाद्यावरच भर द्यावा लागत आहे. मात्र, पशुखाद्याच्या किमती भरमसाट असल्याने शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. सुका चारा म्हणून पिंजर, करड आणि उसाच्या वाडीचा वापर केला जातो. तर काही ठिकाणी कडबादेखील दिला जातो. मात्र, पिंजर-कडब्याचादेखील तुटवडा निर्माण झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.
दूध उत्पादनात घट
चाराटंचाई आणि वाढत्या उष्म्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण दूध उत्पादन घटले आहे. त्यामुळे पशुपालकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. आधीच लम्पीमुळे काही दुभत्या गायी दगावल्या आहेत. त्यातच आता चाराटंचाई निर्माण झाल्याने दूध उत्पादन कमी झाले आहे. जनावरांच्या दूध क्षमतेत घट झाल्याने पशुपालकांचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे.
आवश्यक ठिकाणी चाराछावण्या सुरू करणार : डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)
जिल्ह्यात चारासाठा शिल्लक आहे. काही ठिकाणी चाराटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, आवश्यक त्या ठिकाणी चाराछावण्या सुरू केल्या जाणार आहेत. परिस्थिती पाहून जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे.









