विश्वचषक तिरंदाजी स्टेज 3 : वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात मिळविले यश
वृत्तसंस्था/ मेडेलिन, कोलंबिया
येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 3 स्पर्धेत अभिषेक वर्माने भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम लढतीत विजय मिळवित त्याने हे यश मिळविले.
33 वर्षीय अभिषेक वर्माने 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक रौप्य व कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे. येथील अंतिम लढतीत त्याने अमेरिकेच्या जेम्स लुत्झचा 148-146 असा पराभव करून जेतेपद पटकावले. वर्ल्ड कपमध्ये अभिषेकने अनेक पदके पटकावली आहेत. यावेळी पहिले दोन टप्पे हुकल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तो सहभागी झाला आहे. त्याने याआधी जागतिक अग्रमानांकित व येथे टॉप सीडिंग मिळालेल्या नेदरलँड्सच्या माईक स्क्लोएसरला रोमांचक ठरलेल्या उपांत्यपूर्व लढतीत पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. आठवे मानांकन असलेल्या अभिषेकने नंतर उपांत्य फेरीत ब्राझीलच्या लुकास अॅब्य्रूचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
वर्ल्ड कपमध्ये वैयक्तिक विभागात त्याने मिळविलेले हे तिसरे सुवर्णपदक आहे. 2021 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या टप्प्यात त्याने शेवटचे सुवर्ण मिळविले होते. 2015 मध्ये पोलंडमधील रॉक्लॉ येथे झालेल्या स्पर्धेत त्याने पहिले सुवर्ण जिंकले होते. याशिवाय त्याने वैयक्तिक विभागात दोन रौप्य व एक कांस्यपदकही जिंकलेले आहे.
भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण व 3 कांस्यपदके मिळविली असून रिकर्व्ह मिश्र संघ कांस्यपदकासाठी लढणार असल्याने त्यात आणखी पदकाची भर पडू शकते. भारतीय संघाने फ्रान्स व नेदरलँड्स यांचा 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. पण उपांत्य फेरीत त्यांना कोरियाकडून 5-3 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना आता कांस्यपदकासाठी चिनी तैपेईविरुद्ध लढावे लागणार आहे.









