सर्वपक्षीय बैठकीची मागणी : पंतप्रधान मोदींना हस्तक्षेपाचे आवाहन
► वृत्तसंस्था/ इंफाळ
दीड महिन्यांहून अधिक काळ हिंसाचाराने त्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये जमावाकडून पुन्हा हिंसाचाराचे सत्र वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्य दौऱ्यानंतर काही आठवड्यांनंतर ताज्या घटनेत जाळपोळीसह शस्त्रास्त्र लुटीचे प्रकारही घडले आहेत. इंफाळमध्ये दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स सक्रीय असले तरी काही भागात उपद्रव सुरूच आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सर्वपक्षीय बैठक बोलावून योग्य तोडगा काढण्याची मागणीही होऊ लागली आहे.
हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 20 जून रोजी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी शांततेचे आवाहन करण्यास आणि मणिपूरमधील जातीय हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद न दिल्यास विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये भाजप नेत्यांच्या घरांवर हल्ले होत आहेत. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांचे घर जाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जमावाने आमदार विश्वजित यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने भाजप नेत्या शारदा देवी यांच्या इंफाळमधील पोरामपेटजवळील घरालाही लक्ष्य केले. दोन्ही वेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले.









