105 अॅपद्वारे फैलावला : इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने केले सतर्क
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपण अनेकदा गुगल प्ले स्टोअरवरून अनेक प्रकारे अॅप डाउनलोड करत असतो. हा प्रकार किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज तुम्हाला हे वृत्त वाचून येईल. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने एक असे स्पायवेअर शोधून काढले आहे, जे केवळ मोबाईल फोनमधील ईमल इत्यादी माहिती चोरण्यासह मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करत रिकॉर्डिंग देखील करू शकते.
या स्पायवेअरच्या माध्यमातून जेथे कुठे मोबाईल ठेवलेला असेल, तेथील संभाषण ऐकले जाऊ शकते. हा स्पायवेअर देशातील 42 कोटी अॅन्ड्रॉईड मोबाईल्समध्ये पोहोचला असून याचे नाव ‘स्पिन ओके’ असून तो गुगल प्ले स्टोअरवरील 105 अॅप्सच्या माध्यमातून मोबाईलमध्ये शिरला आहे. याचमुळे केंद्र सरकारने सर्व मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मोबाईलमधून संशयास्पद अॅप्स हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
डिलिट केलेला डाटाही धोक्यात
स्पिन ओके अत्यंत धोकादायक स्पायवेअर आहे. अत्यंत कमी कालावधीत हा स्पायवेअर 42 कोटी मोबाईल्समध्ये पोहोचला आहे. हा स्पायवेअर अॅपद्वारे मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि मग जावा स्क्रिप्टद्वारे स्वत:ची क्षमता वाढवितो. मोबाईलमधील डाटा कॉपी करत तो अज्ञात रिमोट सर्व्हर रुमपर्यंत पोहोचवितो. इतकेच नव्हे तर फोनमधून डिलिट करण्यात आलेल्या फाईल्स देखील प्राप्त करतो. हा स्पायवेअर मोबाईलमधील फाईल्समध्येही बदल करू शकतो. तसेच मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करू शकतो.
स्पायवेअर आहे की नाही कसे कळणार?
विविध तज्ञांनी या स्पायवेअरपासून वाचण्याच्या काही पद्धती सुचविल्या आहेत. मोबाईलमध्ये अनेकदा जाहिराती कुठल्याही कारणाशिवाय झळकत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा स्थितीत तुमच्या मोबाईलमध्ये स्पायवेअरने शिरकाव केला असण्याची पूर्ण शक्यता आहे. याचमुळे मागील काही महिन्यांमध्ये डाउनलोड केलेल्या अॅप्सना अनइन्स्टॉल करणेच योग्य ठरणार आहे.

बचावासाठी काय कराल?
-सर्वप्रथम अॅन्ड्रॉइड फोनमध्ये अँटीव्हायरस अन् अँटी स्पायवेअर डाउनलोड करा.
-कुठलीही वेबसाईट किंवा अॅपवरील जाहिरातींवर क्लिक करू नका.
-ई-मेल किंवा अन्य माध्यमांमधून येणाऱ्या अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.
-गुगल प्ले स्टोअरवरील कुठलेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा रिह्यू अवश्य वाचा.
-विश्वासार्ह नसलेल्या वेबसाईटवरून कुठलेच अॅप डाउनलोड करू नका.
-अॅन्ड्रॉईड फोन वेळोवेळी अपडेट करत रहा.
या अॅप्समध्ये स्पायवेअर
ज्या अॅप्सद्वारे हे स्पायवेअर मोबाईलमध्ये शिरकाव करते, त्यातील बहुतांश अॅप्स ऑनलाईन कॅश रिवॉर्ड, गेम्स, फिटनेस, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ मेकिंग इत्यादींशी संबंधित असतात. यातील 10 प्रमुख अॅप्समध्ये नॉइस व्हिडिओ एडिटर, जापया, बियूगो एमव्ही बिट, क्रेझी ड्रॉप्स, टिक, व्ही फ्लाय, कॅश जॉइन, कॅश ईएम आणि फिज्जो नावेल सामील आहे. जापया आणि नॉइस व्हिडिओ एडिटरचे 10 कोटी युजर्स आहेत. बियूगो, एमव्ही बिट आणि व्ही फ्लायचे देखील 5 कोटीहून अधिक युजर्स आहेत.









