पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित प्रकाशकांपैकी एक गीता प्रेस, गोरखपूरला 2021 च्या गांधी शांतता पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्वसंमतीने गीता प्रेस गोरखपूरला गांधी शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे.
भारत सरकारकडून दरवर्षी गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारादाखल 1 कोटी रुपयांची रक्कम, एक प्रमाणपत्र प्रदान केले जाते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांधी शांतता पुरस्कारावरून चर्चा झाली आणि सर्वसंमतीने गीता प्रेस गोरखपूरची 2021 साठीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गीता प्रेसला सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गीता प्रेसची 1923 मध्ये स्थापना करण्यात आली होती. जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांमध्ये याचा समावेश आहे. गीता प्रेसने 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये श्रीमद् भगवद्गीतेच्या 16.21 प्रती सामील आहेत. गीता प्रेसने चालू वर्षीच 100 वर्षे पूर्ण केली आहेत.









