अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा तू म्हणतोयस तसं देह हा निर्जीव होय परंतु निर्गुण आत्म्याचा त्यात प्रवेश झाला की तो सजीव होतो. देह हा त्रिगुणयुक्त असतो. त्यामुळे त्यात प्रवेश केलेला आत्माही त्रिगुणांनी वेढला जाऊन मायेच्या तडाख्यात सापडतो. त्यामुळे मिथ्या असलेला संसार आत्म्याला खरा वाटू लागतो. संसाराला कोणताही सत्यार्थ नसताना त्याला सत्यत्व दिल्याने तो आटोपता आटपत नाही. आत्म्याला त्यातील विषयांचे ध्यान लागते. मी असे करीन, तसे करीन असे संकल्प त्याला खुणावू लागतात. मग त्या आभासातच तो अस्तित्वात नसलेल्या विषयांचे सेवन करतो. जसजसा तो विषयांचे सेवन करू लागतो तसतसे त्याला विषयात अधिकाधिक गोडी वाटू लागते. ते आणखीन आणखीन भोगायला मिळावेत म्हणून तो अगदी वेडापिसा होतो. ह्याचा परिणाम असा होतो की, ह्या विषयसेवनाच्या वाढत्या ध्यासातूनच ते जास्तीतजास्त भोगायला मिळावेत म्हणून अनेक इष्टानिष्ट कर्मे करतो त्यातूनच तो भवबंधनात अडकतो. आता आणखीन एक गंमत सांगतो. ह्या सर्व विषयांच्या गोडीत रमणाऱ्या मंडळींमध्येच अगदी क्वचित एखादा असा असतो की, त्याला सुदैवाने ह्या सर्व मिथ्यत्वाची जाणीव झालेली असते. अज्ञानी मनुष्याने केलेले विषयसेवन आणि ज्ञानी मनुष्याने केलेले विषयसेवन ह्यात फरक असतो कारण ह्याबाबतीत दोघांचेही अनुभव वेगवेगळे असतात. कसे? तेही तुला सविस्तर सांगतो. मनुष्य झोपलेला असताना त्याला स्वप्न पडते. दिवसभर विषयांच्या मागे धावल्यामुळे रात्री झोपल्यावर ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ह्या न्यायाने स्वप्नात त्याने जागेपणी ध्यास घेतलेल्या विषयाची प्राप्ती होते. जोपर्यंत तो झोपलेला असतो तोपर्यंत त्याला ते स्वप्न खरेच वाटत असते आणि जागे झाल्यावर त्याला स्वप्नाचा खोटेपणा लक्षात येतो. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला इच्छित विषयाची प्राप्ती झालेली नाही हे लक्षात येते. परमार्थाविषयी अनभिज्ञ असलेला अज्ञानी मनुष्य परमार्थाविषयी जागृत नसल्याने तसं बघितलं तर निद्रेतच असतो. निद्रेत असल्याने विषयसेवन मिथ्या आहे हे लक्षात न आल्याने ते सत्य मानून तो त्यांचा उपभोग घेत असतो. एकदा विषयसेवनाची गोडी लागली की, ते त्याला आणखीन हवेत असे वाटू लागते. याउलट परमार्थाविषयी जागृत असलेल्या ज्ञानी माणसाला विषयसेवन करण्याची काहीच आवड नसते. त्याने प्रारब्धानुसार वाट्याला आलेले विषयसेवन केले तरी तो पारमार्थिकदृष्ट्या जागृत असल्याने त्याला त्यातील खोटेपणाची संपूर्ण जाणीव असते. आपण कधी कधी लहान मुलांनी आग्रह केल्यावर त्यांच्याबरोबर खेळ खेळतो. लहान मुले हरण्या जिंकण्याचा विचार करून पुरेशा गांभीर्याने खेळत असतात तर आपण केवळ त्यांचं मन राखायचं म्हणून खेळत असतो. त्या खेळात आपण जिंकलो काय वा हरलो काय आपल्याला सारखंच असतं कारण त्यातलं मिथ्यत्व आपण जाणून असतो. म्हणजेच खेळ खेळताना त्याकडे कसं बघायचं हे आपल्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे त्यातील हरण्या जिंकण्याचं आपल्याला काहीच महत्त्व नसतं. पारमार्थिक दृष्ट्या जागृत असलेला मनुष्य जीवनाकडे असंच पहात असतो. त्यामुळे तो विषयसेवन करताना त्यापासून अलिप्त असतो. त्यामुळे विषयसेवन केले काय किंवा नाही केले काय त्याला त्यात फरक वाटत नाही. उद्धवा तुला आणखी एक उदाहरण देतो. नाटकातील नट, नट्या नाटकामध्ये समजून उमजून नवराबायकोची भूमिका निभावतात त्यासाठी आवश्यक ते हावभाव, बोलणे चालणे करून आपण वास्तवातले नवराबायको आहोत असे त्यांच्या अभिनयातून, विभ्रमातून प्रेक्षकांना भासवतात आणि त्यांच्याकडून पसंतीच्या टाळ्या मिळवतात. भूमिका निभावताना प्रत्यक्षातील जीवनात आपण कोण आहोत ह्याचे त्यांना संपूर्ण भान असते. म्हणूनच नाटकात राजाची भूमिका करणारा नट प्रत्यक्षात तसे न वागता त्याचे वास्तवातले जीवन जगत असतो.








