मसुरे प्रतिनिधी
टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे २२ जून ते २६ जून या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे .
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघामध्ये मुंबई उपनगर संघामधील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे – टोकळवाडी गावचा सुपुत्र युवा खेळाडू आकाश संतोष मसुरकर याची निवड झाली आहे. आकाश याच्यासोबतच सिंधुदुर्ग देवगड मधील प्रकाश पराडकर ,सुदेश नारकर,वेदांत जाधव, या सिंधू पुत्राचीही निवड झाली आहे. तसेच मुंबईच्या अभिषेक मोडकर,
उत्कर्ष जुवाटकर,अभिषेक सांगळे,रोहन चव्हाण,तन्मय बांदेकर,मानस पाटील या खेळाडूंची निवड केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मुंबई सचिव श्री संदीप पाटील यांनी दिली.
आकाश मसुरकर हा मालवण तालुक्यातील मसुरे गावातील टोकळवाडी या भूमीचा सुपुत्र असून जिल्हा, राज्य, मुंबई, बेळगाव, गोवा , सिंधुदुर्ग येथील विविध स्पर्धेत मध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नाव लौकिक मिळविला होता. आक्रमक फटकेबाज फलंदाज म्हणून अल्पावधीतच आकाशाने टेनिस क्रिकेट विश्वात नावलौकिक मिळविला आहे. तसेच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात स्थान मिळवणारा आकाश हा मसुरे गावचा पहिला खेळाडू आहे.आकाश मसुरकर याला त्याचे वडील प्रसिद्ध भजनी बुवा, समाजसेवक संतोष मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी गुणवंत सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन, मुंबई उपनगर टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि मसुरे गावातून अभिनंदन होत आहे