ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तरप्रदेशात मागील तीन दिवसात उष्माघाताने 54 जण दगावले आहेत. तर 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आहे.
बलिया येथील रुग्णालय अधिक्षक एस. के. यादव यांनी सांगितले की, 15 जूनला उष्माघाताने 23 जणांचा, 16 जूनला 11 तर 17 जूनला 20 रुग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या उष्णतेने रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बहुतांशी रुग्ण हे बलिया जिल्ह्यातील आहेत.
दरम्यान, वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता लखनऊमधून एक आरोग्य टीम चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे, ही टीम या ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज घेईल. उष्णता वाढल्याने मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना धोका वाढतो. तसेच तापमानाचा पारा वाढल्याने देखील अशा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. आजमगढ सर्कलचे अतिरिक्त स्वास्थ निदेशक डॉ. बीपी तिवारी यांनी सांगितलं.









