इचलकरंजी / प्रतिनिधी :
शहरालगतच्या स्टारनगर ते पार्वती औद्योगिक वसाहत रस्त्यावर रेकॉर्डवरील एका गुन्हेगारासह दोघांनी जमीन खरेदी विक्री करणारा व्यावसायिक आणि झेरॉक्स मशीनचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकावर दशहत निर्माण करत त्यांना चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसविले. त्याला गाडीत बेदम मारहाण करीत त्याच्याकडे साडेआठ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्यांच्या साथिदाराने यापूर्वी याच झेरॉक्स मशीन व्यावसायिकाकडून चार लाखाची खंडणी उकळली आहे.
याप्रकरणी गुन्हेगार अविनाश टेके (रा. तारदाळ नाका, शहापूर, ता. हातकणंगले), त्याचा साथिदार संदीप चौगुले (रा. आभार फाटा, चंदुर, ता. हातकणंगले) शहापूर पोलिसात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. परशराम वसंतराव मिरजकर (मूळ रा. पार्वती सुत गिरणीसमोर, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. उजळाईवाडी, ता. करवीर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
झेरॉक्स मशीन व्यावसायिक परशराम मिरजकर यांचा जमीन खरेदी विक्रीचा देखील व्यवसाय आहे. तो आणि संशयीत आरोपी टेके एकमेकांचे मित्र आहेत. रामचंद्र कारंडे (रा. निमशिरगाव, ता. शिरोळ) याची मौजे कोंडीग्रे गावच्या हद्दीत प्रॉपटी आहे. या प्रॉपटीसाठी मिरजकरला संशयीत टेके आणि त्याचा साथिदार चौगुले या दोघानी संगनमत करुन चाकुचा धाक दाखवून कारंडेच्या प्रॉपटीचा मालक म्हणून उभा करुन रेश्मा अनिल पवार (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांना खरेदी खत दिले. त्या पद्धतीचा खरेदीपत्र देखील केले. हा प्रकार प्रॉपटी मालक कारंडेच्या निदर्शनास आला. या गैर व्यवहार प्रकरणी तू अडकणार आहेस. तुझ्यावर पोलीस केस होणार, अशी भिती घालून, त्याचेकडून चार लाख रुपयांची खंडणी घेतली.

त्यानंतर आजून आठ लाख पन्नास हजार रुपये वसूल करणेकरीता गुन्हेगार टेके आणि त्याचा साथिदार चौगुले या दोघानी त्याला शहरानजीकच्या स्टारनगर ते पार्वती औद्योगिक वसाहत रस्त्यावर चार चाकीत गाडीत जबरदस्तीने बसविले. त्याच्याकडे साडेआठ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन गाडीमध्येच बेदम मारहान केली. खंडणीचे पैसे दिले नाही, तर तुला व तुझ्या परिवाराला ठेवणार नाही अशी ठार मारण्याची धमकी दिली.









