आयओए’ची आशियाई ऑलिम्पिक मंडळाकडे मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) ‘आशियाई ऑलिम्पिक मंडळा’कडे (ओसीए) संपर्क साधून आशियाई खेळांकरिता देशाच्या कुस्ती संघाचा तपशील देण्यासाठी असलेली 15 जुलैची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. निदर्शने करणाऱ्या प्स्तीपटूंनी क्रीडा मंत्रालयाला ऑगस्टमध्ये चाचण्या घेण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 15 जुलैपर्यंत सर्व संघांच्या याद्या ‘ओसीए’कडे सादर करणे आवश्यक आहे. संघटनेने आधीच सर्व राष्ट्रीय महासंघांना त्यांनी निवडलेल्या खेळाडूंची अंतिम नावे 30 जूनपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. बजरंग पुनियासह आंदोलक कुस्तीपट आशियाई खेळांसाठीच्या चाचण्यांमध्ये भाग घेण्यास उत्सुक आहेत. परंतु त्यांना चांगल्या शारीरिक स्थितीत राहण्यासाठी वेळ हवा आहे. कारण भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध दीर्घकाळापासून चाललेल्या निदर्शनांमुळे त्यांना तयारीसाठी वेळ मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्तीपटूंनी क्रीडा उपसचिव एस. पी. एस. तोमर यांना पत्र लिहिले असून मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही विनंती भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज हाताळणाऱ्या अस्थायी समितीकडे पाठविली आहे. ‘आयओए’च्या एका सूत्राने सांगितल्यानुसार, सदर अस्थायी समितीने भारतीय ऑलिम्पिक संघाटनेशी संपर्क साधलेला असून संघटनेने ‘ओसीए’ला पत्र लिहून अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली आहे.









