वृत्तसंस्था/ चेन्नई
विश्व स्क्वॅश फेडरेशनच्या शनिवारी येथील एक्स्प्रेस अॅव्हेन्यू मॉलमध्ये झालेल्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेचे अजिंक्यपद टॉप सिडेड इजिप्तने पटकावले. अंतिम लढतीत इजिप्तने चौथ्या मानांकित मलेशियाचा 2-1 (4-1 गुणांनी) पराभव केला. 2011 साली येथे झालेल्या शेवटच्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेचे अजिंक्यपद इजिप्तने मिळवले होते. आता त्यांनी पुन्हा हे जेतेपद स्वत:कडे राखले आहे.
या स्पर्धेत यजमान भारताला उपांत्य फेरीत मलेशियाकडून हार पत्करावी लागली होती. मलेशियाने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला हाता. मात्र, त्यांना टॉप सिडेड इजिप्तला कडवा प्रतिकार करता आला नाही.
इजिप्त आणि मलेशिया यांच्यातील झालेल्या अंतिम लढतीत विद्यमान विजेत्या इजिप्तला पहिलाच सामना गमवावा लागला. पण त्यानंतर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकून मलेशियाचे आव्हान संपुष्टात आणले. पहिल्या सामन्यात मलेशियाच्या झिन यांग यी ने इजिप्तच्या केंझी अॅमेनचा 7-4, 7-5, 7-6 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इजिप्तच्या अॅली अबू इनेनने मलेशियाच्या डॅरेन प्रेगसेमचा 7-3, 7-6, 7-4 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सामन्यात इजिप्तच्या फिरोज अबुलखेरने मलेशियाच्या येरा अॅझमनवर 7-4, 7-5, 6-7, 7-6 असा पराभव करत मलेशियाचे आव्हान संपुष्टात आणले. तिसऱ्या आणि शेवटच्या मलेशियाची 18 वर्षीय अॅझमनकडून थोडा फार प्रतिकार झाला पण इजिप्तच्या अबुलखेरने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर विजय हस्तगत केला. या स्पर्धेत प्राथमिक गटातील झालेल्या लढती इजिप्तने मलेशियाचा 3-1 अशा फरकाने पराभव केला होता. या स्पर्धेमध्ये इजिप्तच्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केल्याने या संघाचे प्रशिक्षक मोहमद इकेली यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी उपांत्य लढतीत इजिप्तने जपानचा 4-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मलेशियाने भारताचे आव्हान 3-0 असे एकतर्फी संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली होती. मलेशिया आणि भारत यांच्यातील उपांत्य लढतीत पहिल्या सामन्यात मलेशियाच्या साई आँगने भारताच्या अभय सिंगचा 7-4, 5-7, 1-7, 7-1, 7-6 असा पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात मलेशियाच्या आयरा अझमनने भारताच्या ज्योत्स चिन्नाप्पाचा 7-3, 7-3, 5-7, 7-4असा पराभव करत आपल्या संघाची आघाडी वाढवली. तिसऱ्या एकेरी सामन्यात मलेशियाचया डॅरेन प्रेगसमने भारताच्या सौरव घोषालवर 7-5, 2-7, 7-6, 6-5 अशी मात केली. या लढतीत भारताच्या स्क्वॅशपटूंनी संपूर्ण निराशाजनक कामगिरी केली.









