वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून तेथे केंद्रीय सुरक्षा दले नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला तेथील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असताना मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
केंद्राने हा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला आहे. या उच्च न्यायालयाने हिंसाचारासंबंधी नाराजी व्यक्त करताना केंद्रीय दलांची नियुक्ती करण्यात यावी असा निर्णय दिला होता. हा आदेश न्यायालयाने पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाला दिला होता. आता तेथील निवडणूक आयोग आणि ममता बॅनर्जीं यांचे सरकार अशा दोघांनीही संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य निवडणूक आयोग निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दलांना पाठविण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकार आणि तेथील निवडणूक आयोग यांनी आपल्या याचिकेत केली आहे. या याचिकेवर केव्हा सुनावणी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.









