वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हाती देशाची सूत्रे सोपविण्यात आली असती, तर भारताची फाळणी झाली नसती, असे महत्वपूण्& विधान देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केले आहे. येथे शनिवारी ‘असोचॅम’ (असोशिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंटस्ट्रीज ऑफ इंडिया) या संस्थेने आयोजित केलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी भारताच्या इतिहासावर या व्याख्यानात प्रकाश टाकला.
सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्यावेळी गांधीजी त्यांच्या उत्कर्षाच्या शिखरावर होते. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिलेले आव्हान निष्फळ ठरले. त्यांना काँग्रेस सोडून बाहेर पडावे लागले. काँग्रेसबाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या मार्गाने ब्रिटीशांशी संघर्ष सुरु ठेवला होता. तथापि, त्यांना त्यातही अपशय आले. त्यावेळी त्यांना पाठबळ मिळाले असते तर त्यांच्याच हाती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वातंत्र्यानंतर भारताची सूत्रे राहिली असती. पाकिस्तानचे निर्माते आणि भारताच्या फाळणीला जबाबदार असणारे मुस्लीम लीगचे नेते मोहम्मद अली जीना हे सुभाष चंद बोस यांच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस नेते होणार असतील तर पाकिस्तान मागणार नाही, असे त्यांनीं स्पष्ट केले होते. तथापि, बोस यांच्या हाती सूत्रे देण्यास गांधी आणि काँग्रेस यांनी नकार दिल्याने भारताच्या फाळणीचा पाया रचला गेला, अशी मांडणी आपल्या भाषणात अजित डोभाल यांनी केली आहे.
बोस यांनी आपल्या एकट्याच्या जीवावर ब्रिटीशांशी केलेला संघर्ष विफल ठरला असला तरी तो लढा फारच महत्वाचा होता. त्याला भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्वाचे स्थान आहे. त्यांचे योगदान भारत विसरु शकत नाही. त्यांच्या राष्ट्रवादी विचारांची आजही काही जणांना भीती वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.