कॅनडाचाही समावेश, खलिस्तानवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिका आणि कॅनडातील भारतीय दूतावासांवर खलिस्तानवादी दशहतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) आपल्या हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता एनआयएने प्रत्यक्षरित्या ही चौकशी सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
10 जूनला अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी दगडफेक होती. त्यांनी दूतावासाचे संरक्षक बॅरीकेड्स् तोडून आत प्रवेश केला होता. तसेच दूतावासाच्या प्रांगणात खलिस्तानचे झेंडे लावले होते. त्यानंतर दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी ते झेंडे काढून टाकले होते. भारताने तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा निषेध अमेरिकडे नोंदविला होता.
कॅनडातही हल्ले
कॅनडामध्येही अशाच प्रकारचे हल्ले भारतीय दूतावासांवर करण्यात आले होते. भारताने कॅनडा सरकारकडे याचा निषेध नोंदविला होता. तसेच असे हल्ले दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये अडथळे ठरु शकतात, असा इशाराही दिला होता. 12 जूनला भारतीय उच्चायोग कार्यालयाने या हल्ल्यांचे सीसीटीव्ही फूटेज प्रसारित केले होते. या फूटेजच्या आधारावर हल्लेखोरांना शोधण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्षदर्शींनी साहाय्य करावे असे आवाहनही भारतीय उच्चायोगाकडून करण्यात आले होते.
ब्रिटनमध्येही असेच प्रकार
त्याचवेळी ब्रिटनमध्येही लंडन येथील भारतीय उच्चायोगाच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली होती. कार्यालयावरचा भारताचा राष्ट्रध्वज खलिस्तानी दहशतवाद्यांनी खाली उतरविला होता. तसेच दूतावासाच्या इमारतीची हानी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याही घटनेची चौकशी केली जाणार आहे.
हल्ल्यांचे कारण काय ?
भारतात खलिस्तानी हिंसाचाराचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात असलेला दहशतवादी अमृतपालसिंग याला पकडण्यासाठी केंद्र सरकारने आणि पंजाब सरकारने जोरदार अभियान चालविले होते. अखेर त्याला पकडण्यात भारतीय सुरक्षा दलांना यशही आले होते. यामुळे सिंग याचे विदेशातील सूत्रधार संतापले होते आणि त्यांनी कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधील भारतीय दूतावांवर हल्ले केले होते. परिणामी, दूतावांची सुरक्षा धोक्यात आली होती.
हल्ले निष्फळ
खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न व्यापक हिंसाचार माजविण्याचा आणि भारतीय दूतावांमध्ये मोठी हानी घडविण्याचा होता. तथापि, त्यांना या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकले नव्हते. तसेच अमृतपालसिंग याच्यावरील कारवाई थांबविण्याचा दहशतवाद्यांच्या मागणीलाही भारतान दाद दिली नव्हती. या तीन्ही देशांच्या पोलिसांनीही योग्य ती कारवाई करुन भारतीय दूतावांना अधिकची सुरक्षा प्रदान केली होती. परिणामी, हल्लेखोरांचे दहशत माजविण्याचे प्रयत्न वाया गेले होते.
उच्चायुक्तांना पाचारण
या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी भारताने ब्रिटन आणि कॅनडा या देशांच्या भारतातील मुख्य प्रतिनिधींना परराष्ट्र व्यवहार विभागाच्या कार्यालयात पाचारण केलो होते. त्यांच्याकडे या हल्ल्यांचा निषेध करतात कठोर चौकशी मागणी करण्यास आपापल्या सरकारांना सांगावे, अशीही सूचना केली होती. आता एनआयएने या प्रकरणाची चौकशी आपल्या हाती घेतल्यानंतर खलिस्तानवादी दहशत पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.