पोलीस स्थानकातून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न; राजकीय नेत्यांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच
वृत्तसंस्था/ .इंफाळ
मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री वेगवेगळ्या भागात जाळपोळ आणि तणावाच्या पाच मोठ्या घटना घडल्या. शेकडो लोकांच्या जमावाने इंफाळ पश्चिम येथील इरिंगबाम पोलीस स्थानकावर शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केल्यानंतर जमावाकडून गोळीबारही करण्यात आला. अन्य एका घटनेत भाजप आमदार विश्वजीत यांच्या घराला जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केला. मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या पथकाने वेळीच दक्षता घेतल्याने जाळपोळ झाली नाही. तिसरी घटना खेंगमान आणि सिंजमाई भागात घडली असून दोन्ही ठिकाणी जमावाने भाजपच्या कार्यालयांवर हल्ले केले. मात्र, लष्कराच्या जवानांनी जमावाला पळवून लावले.
वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या जमावाच्या हल्ल्यांमुळे सर्व भागातच सुरक्षा यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आली आहे. बहुतांश भागात जवान तैनात असले तरी जमाव शस्त्रे व पेट्रोलबॉम्बसह हल्ले चढवत असल्यामुळे त्यांना आवर घालणे कठीण होत आहे. राजधानी इंफाळमधील पोरम्पेटमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा जमावाने भाजप महिला अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तर अन्य एका घटनेत सुमारे 1,000 लोकांचा जमाव कंपाऊंड जाळण्यासाठी आल्याचेही सांगण्यात आले. विष्णुपूर जिह्यातील क्वाकटा आणि चुराचंदपूर जिह्यातील कांगवाई येथेही गोळीबाराच्या घटनांची नोंद झाली आहे. लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्सने राजधानी इंफाळमध्ये मध्यरात्रीपर्यंत संयुक्तपणे मोहीम राबवत हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला.

जवान, पोलिसांच्या वेशात हल्ल्यांचा धोका : गुप्तचरांचा इशारा
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमधील आरक्षणावरून झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा हा संघर्ष वाढत असून जवान किंवा पोलिसांच्या गणवेशात काही लोक राज्यात घुसू शकतात, असा दावा गुप्तचरांनी केला आहे. या लोकांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचे गणवेश शिवण्याची ऑर्डर दिल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. आताही काही लोकांनी पोलीस आणि कमांडोंचे गणवेश बनवले असून हिंसाचार भडकवण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
गेल्या दीड महिन्यापासून राज्यात हिंसाचार सुरू असल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही पर्याय आहे, परंतु त्याबाबत परिस्थिती स्पष्ट नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी अद्याप केलेली नाही. त्यामुळे सध्या हिंसाचार शांत करण्यासाठी इतर पर्यायांवर विचार सुरू आहे. तसेच हिंसाचार वाढल्यास राष्ट्रपती राजवटीचाही विचार होऊ शकतो.
...सीरियासारखी परिस्थिती : निवृत्त लेफ्टनंट
माजी लष्करप्रमुखांनी केली केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी
राज्यातील हिंसाचाराच्या दरम्यान माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. तसेच निवृत्त लेफ्टनंट जनरल एल. निशिकांत सिंग यांनी ट्विट करत राज्यात सीरिया-लीबियासारखी हिंसक परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. ‘मी मणिपूरमधील एक सामान्य भारतीय नागरिक आहे. सध्या मी निवृत्त जीवन जगत आहे. मणिपूर आता राज्यहीन आहे. जीवन आणि संपत्ती कोणीही कधीही नष्ट करू शकते अशीच परिस्थिती राज्यात आहे. लीबिया, लेबनॉन, नायजेरिया, सीरिया येथे अशा घटना घडतात. त्याचप्रमाणे आता मणिपूरही हिंसाचार आणि आगीच्या वणव्यात बुडाले आहे. याकडे कोणी लक्ष देणार का?’ अशी विचारणा निवृत्त लेफ्टनंटनी केल्यानंतर माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी चिंता व्यक्त केली. लष्कराच्या अधिकाऱ्याने असे बोलणे अत्यंत खेदजनक आहे. राज्यातील परिस्थितीकडे सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.









