महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : अर्ज प्रक्रियेला लवकरच प्रारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने पाच गॅरंटीपैकी ‘शक्ती’ योजनेची अंमलबजावणी केली आहे. या योजनेंतर्गत परिवहनच्या बसेसमधून महिलांना मोफत प्रवास करता येत आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता राज्यातील जनतेचे लक्ष ‘गृहलक्ष्मी’ योजनेकडे लागले आहे. 15 जूनपासून या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे चार-पाच दिवस विलंब होत असल्याचे सरकारने सांगितले आहे. दरम्यान, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 17 किंवा 18 ऑगस्ट रोजी गृहिणींच्या खात्यावर 4 हजार जमा होतील, असे सांगितले आहे.
शनिवारी चिक्कमंगळूर जिल्ह्यातील गौरीगद्दे आश्रमामध्ये आयोजित चंडीकायागमध्ये सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. महिलांना दरमहा 2 हजार रुपये साहाय्यधन देण्याच्या योजनेला काहीसा विलंब होत आहे. योजनेमध्ये किरकोळ बदल करण्याची तसेच गृहलक्ष्मी योजनेकरिता स्वतंत्र अॅप तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अधिकारी सॉफ्टवेअर/अॅप तयार करत आहेत. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
योजनेचा लाभ महिलांना सहजपणे मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. 17 किंवा 18 ऑगस्ट रोजी गृहिणींच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातील, यात शंका नाही. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊ नये, याकरिता त्यात काही बदल केले जात आहेत. सुरुवातीला बेंगळूर वन, कर्नाटक वन, ग्राम वन केंद्रांमध्ये अर्ज दाखल करता येतील, असे सांगण्यात आले होते. याबरोबरच ग्राम पंचायतींमधील बापूजी सेवा केंद्रांमध्येही अर्ज करण्याची व्यवस्था केली जाईल.
यापूर्वी गुरुवारी सकाळी सरकारने 16 जूनपासून गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, त्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चार-पाच दिवस लांबणीवर टाकण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे अर्ज दाखल करण्यास केव्हापासून प्रारंभ होईल, याविषयी महिला वर्गात प्रतीक्षा आहे.
मोफत विजेसाठी आजपासून अर्ज प्रारंभ
राज्य सरकारने दिलेल्या गॅरंटीपैकी महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘गृहज्योती’ अंतर्गत रविवारपासून अर्ज करण्यास प्रारंभ होणार आहे. याकरिता सेवा सिंधू पोर्टलवर अर्जही अपलोड करण्यात आले आहेत. भाडोत्री घरांमध्ये राहणाऱ्यांना देखील ही योजना लागू आहे.
दरमहा 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीवेळी दिली होती. आता या पक्षाचे सरकार आले असून मोफत वीज पुरवठ्याची गृहज्योती योजना जारी केली जात आहे. 1 जुलैपासून ही योजना लागू होत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. रविवार दि. 18 जूनपासून प्ttज्s://sान्asग्ह्प्ल्gs1.क्arहूक्a.gदन्.ग्ह/र्ग्ह्.ोप्tस्त् या सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.
राज्यात 2.14 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांना मीटरचा आर. आर. नंबर आणि आधार क्रमांक सक्तीने नोंदवावा लागणार आहे. स्वत:चे घर असणारे, स्वतंत्र मीटर असणारे अपार्टमेंटमधील रहिवासी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने निश्चित केलेल्या मार्गसूचीनुसार ही योजना लागू केली जात आहे