आपल्या आयुष्यात अनेकदा अनपेक्षित घटना घडतात हा जवळपास सर्वांचा अनुभव आहे. यांपैकी काही घटना अतिशय अनोख्या असतात. कॅनडातील टूडी शॅटलर मॅकिनन या 34 वर्षीय महिलेला, ती समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेली असताना, समुद्रातून तरंगत येत असलेली एक बाटली दिसली. तिने कुतुहलाने ती बाटली घेऊन उघडून पाहिली. प्लॅस्टिकच्या त्या बाटलीत एक संदेश होता.
या संदेशावरुन तिला असे समजले की ती बाटली 34 वर्षांपूर्वी एका व्यक्तीने समुद्रात लेखी संदेशासह टाकली होती. ‘ही बाटली 29 मे 1989 या दिवशी पोर्ट ऑक्स चॉईस येथील फॉक्स पॉईंट या स्थापापासून 10 किलोमीटर दूर अंतरावर समुद्रात टाकली आहे’ असा संदेश त्या बाटलीत होता. ती 34 वर्षे 1 आठवडा इतका कालावधी समुद्रात तरंगत राहिली. या महिलेचे म्हणणे असे आहे की, ती नेहमीच समुद्रावर फिरावयास जाते आणि अशी एखादी बाटली समुद्रातून तरंगत आपल्या हाती लागावी अशी तिची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती इच्छा अचानकपणे पूर्ण झाली, याचा तिला खूपच आनंद झाला.
आता तिने बाटली टाकणाऱ्याचा शोध हाती घेतला. फेसबुकवर तिने यासंबंधीची माहिती पोस्ट केली. काही काळानंतर तिला बाटली टाकणाऱ्याचा शोधही लागला. त्या व्यक्तीचे नाव होते गिल्बर्ट हॅमलीन. मात्र, दुर्दैवाने हॅमलीन यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. मात्र, त्यांच्या मुलाने ही बाटली ओळखली आणि ती आपल्याच वडिलांनी 34 वर्षांपूर्वी समुद्रात टाकल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर त्याच्या पत्त्यावर मॅकिनन यांनी ती पाठविली आणि त्यांना कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटले. हॅमलीन यांच्या मुलाने त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. कारण कोणीतरी ही बाटली आपल्यापर्यंत आणून देईल अशी त्याच्या दिवंगत वडिलांनी इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर का असेना, पण ती पूर्ण झाल्याचे समाधान मुलालाही होते.