नगरसेवकांची महापौरांकडे मागणी : राकसकोप जलाशयाला देणार भेट
बेळगाव : राकसकोप जलाशयाने तळ गाठला आहे. आता डेडस्टॉकमधील पाणी उपसा करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी करण्याची मागणी केली आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी शुक्रवारी महापालिकेमध्ये बैठक घेतली होती. त्यामध्ये नगरसेवकांनी ही मागणी केली. येत्या दोन दिवसांत याबाबत तारीख निश्चित करून राकसकोपला जाण्याचे ठरविण्यात येणार आहे. महापौरांनीही मान्यता दिली असून लवकरच नगरसेवकांचा पाहणीदौरा होणार आहे. सध्या शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत आहे. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी प्रथम पाण्याच्या समस्येला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. इतर विषयांवर चर्चा करण्यापेक्षा पाणी समस्या कशी दूर होईल, याबाबतच सध्या साऱ्यांनी आपले विचार मांडावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अनेक नगरसेवकांनी राकसकोप जलाशयाने तळ गाठला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे असून तातडीने त्याठिकाणी जाण्याची मागणी केली.
गेटटुगेदरला विरोध
पाणी समस्येबरोबरच कचऱ्याच्या समस्येबाबतही काही नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्या तक्रारींवरही चर्चा करण्यात आली. कचऱ्याची उचल वेळेत व्हावी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. प्रारंभी काहीजणांनी गेटटुगेदर करण्याबाबत चर्चा केली. मात्र त्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. प्रथम जनतेच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. त्या सोडविणे आपले कर्तव्य आहे, असे सांगत गेटटुगेदरला विरोध केला. पाणी, कचरा, पथदीप आणि स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या कामांबाबत जोरदार चर्चा करण्यात आली. कामांच्या दर्जाबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही कामे दर्जेदार झाली तरी बहुसंख्य कामे दर्जाहीन असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अनेक कामे दोन ते तीनवेळा केली जात आहेत. महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे बोट दाखवित आहे. स्मार्ट सिटीचा कारभार कसा चालला आहे, याची माहिती देण्यास तयार नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची बैठक स्वतंत्रपणे बोलवावी, अशी जोरदार मागणीही केली. एकूणच महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये समस्यांवर अधिक चर्चा करण्यात आली.









