माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ नेते मारुती परमेकर यांच्याकडे जबाबदारी
वार्ताहर /नंदगड
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून म. ए. समितीचे खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव एस. एन. बेडरे, खजिनदार संजीव पाटील, नंदगड विभागाचे उपाध्यक्ष अर्जुन देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. म. ए. समितीची बैठक येथील शिवस्मारकात बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. राजाराम देसाई यावेळी बोलताना म्हणाले, सीमाप्रश्न जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत मराठी माणूस सीमाप्रश्नासाठी, समितीसाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे. त्यामुळे मराठी माणसांनी इकडे तिकडे न जाता म. ए. समितीशी बांधील राहणे ही काळाची गरज आहे. अमृत शेलार यांनी निवडणुकीत प्रचार यंत्रणा कशी राबवायला हवी होती, याची माहिती देऊन पाच वर्षे आपण लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी म्हणावे तसे काम केलेले नाही. प्रत्येक आंदोलन, लढ्यावेळी लोकांना त्यात सामावून घेऊन समितीविषयी आपलेपणा आणि आदर ठेवण्यासाठी आपण कमी पडलो. त्यामुळेच म. ए. समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले. रमेश धबाले म्हणाले, युवकांना आपण समितीच्या प्रवाहात सामील करून घेण्यास कमी पडलो. आपणाकडे आर्थिक भांडवल नसले तरी सरस्वतीची गरज आहे. त्यामुळे बुद्धिवंत युवकांना समितीच्या प्रवाहात सामील करून घेऊन समितीची पुन्हा मोट बांधूया, असेही सूचित केले.
नारायण कापोलकर म्हणाले, सरकारी दवाखान्यावर केवळ कन्नडमध्ये बोर्ड लावण्यात आला आहे. तेथे मराठी भाषेत बोर्ड लावण्यात यावा म्हणून मोठा लढा उभारण्याची गरज आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. म्हणूनच आपला पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण कशी उभारी घेता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा अभिप्राय व्यक्त केला. राज्य सरकारने वीजबिल वाढविले आहे. त्यामुळे जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. जनतेत वाढीव वीजबिलाविषयी तीव्र असंतोष पसरला आहे. परंतु म. ए. समितीतर्फे अद्याप आंदोलन करण्यात आलेले नाही. यासाठी तीव्र आंदोलन उभारून संबंधितांना निवेदन देऊन समितीचा लढा जागृत ठेवण्याबद्दल आबासाहेब दळवी यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव एस. एन. बेडरे, खजिनदार संजीव पाटील, माऊती परमेकर, अर्जुन देसाई, निरंजन सरदेसाई, एन. एन. पावले आदींनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला प्रकाश चव्हाण, ईश्वर बोबाटे, मऱ्याप्पा पाटील, ब्रह्मानंद पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









