जीएसएस कॉलेजमध्ये एक वेगळा वर्ग सुरू करण्याची एसकेई संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर यांची घोषणा
बेळगाव : एसकेई सोसायटी संचालित जीएसएस कॉलेजच्यावतीने ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेची आवड असून एसएसएलसी बोर्डाच्या परीक्षेत काही कारणास्तव कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांचा पीयुसी प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी एक वेगळा वर्ग या वर्षीपासून जीएसएस कॉलेजमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे एसकेई संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर यांनी घोषित केले आहे. इयत्ता दहावीमध्ये कमी गुण पडून बारावीमधून बोर्डात नंबर आल्याच्या अनेक उदाहरणांचा दाखला देऊन ते म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना एसएसएलसी बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी विशेष काळजी घेऊन योग्यरीतीने तज्ञांकरवी मार्गदर्शन करून अकरावी व बारावीच्या परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जाण्यासाठी या वर्गातून तयार करता येईल. एसएसएलसी परीक्षेमध्ये कमी गुण पडूनसुद्धा आयएएस, युपीएससी, केपीएससी, इंजिनिअरिंग, मेडिकल, संशोधन, विविध सैन्य दले अशा अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे जीएसएस कॉलेजमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता जीएसएस कॉलेजतर्फे देण्यात येणाऱ्या या नवीन संधीचे सोने करून आपले भविष्य उज्ज्वल घडवावे, असे आवाहन किरण ठाकुर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. सूरज मेणसे (8970283537), प्रा. चारुशिला बाळेकाई (9035635337) व प्रा. शशांक बोरकर (9741397662) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









