तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांना कुणकुण : नवीन कोण याचीच उत्सुकता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण विभागात अनेक दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांनी बदल्या करण्यात येणार असल्याने त्यांच्या जागी नवीन अधिकारी कोण येणार, याची उत्सुकता शिक्षकांना लागली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना इतरत्र बदली होण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार? असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होत होता. अडीच ते तीन वर्षांनी एकदा तरी अधिकाऱ्यांची बदली व्हावी, असे नियम असताना काही अधिकारी मात्र चार वर्षे होऊन गेली तरी तंबू ठोकून आहेत. काही अधिकारी गटशिक्षणाधिकारी तर काही अधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील असल्याने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न होत होते. येत्या दोन दिवसात काही अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या जागी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक होण्याची चिन्हे आहेत. अधिकाऱ्यांची बदली झाली तरी शिक्षण विभागातील कारभार सुधारणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









