मनपा उदासीन, नसबंदी मोहीम थंडावली, जनावरांवरही हल्ले सुरूच
बेळगाव : जनावरांवरती भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. नुकतेच गोंधळी गल्ली येथील दोन रेडकांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने मनपा बंदोबस्ताची मोहीम सक्रिय करणार का? किंवा नसबंदी मोहीम राबवणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हल्ला झालेल्या जखमी रेडकांवर तातडीने उपचार करण्यात आले. पशुसंगोपन खात्याच्या डॉक्टरांनी उपचार करून रेडकांना बरे केले. मात्र कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. शहरात कचऱ्यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे भटकी कुत्रीदेखील वाढू लागली आहेत. टाकावू पदार्थ खायला मिळत असल्याने भटक्या कुत्र्यांची पैदास होऊ लागली आहे. विशेषत: कचराकुंडी आणि टाकावू पदार्थाजवळ कुत्र्यांचा कळप दिसू लागला आहे. दरम्यान खायला काहीच मिळाले नाही तर लहान मुले आणि भटक्या जनावरांवर हल्ले करू लागले आहेत. मनपाने भटक्या कुत्र्यांसाठी नसबंदी मोहीम अधिक सक्रिय करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील भटकी जनावरे आणि कुत्री टाकाऊ पदार्थांवर तुटून पडत आहेत. दरम्यान खाण्यासाठी एकमेकांवर हल्ले होऊ लागले आहेत. यातूनच जनावरे जखमी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. विशेषत: लहान जनावरांची लचके तोडले जात आहेत. दरम्यान गंभीर जखमी होऊन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. जखमी झालेल्या रेडकांना श्रीनगर येथील मनपाच्या गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. जखमी जनावरे बरी झाली असली तरी शहरात जनावरांवर कुत्र्याचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे.









