सर्वत्र ढगाळ वातावरण : पावसाची हुलकावणी : बळीराजाच्या चिंतेत वाढ
वार्ताहर /किणये
मृग नक्षत्राला सुरुवात होऊन नऊ दिवस झाले. तरीही तालुक्यात पावसाचा अद्याप पत्ता नाही. यंदा वळीव पावसानेही हुलकावणी दिली. मान्सूनचा पाऊस झाला नाही. यामुळे गेला पाऊस कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील कामे खोळंबली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. तालुक्याच्या बहुतांशी शेत शिवारात भातपेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली आहे. मशागतीची कामेही करण्यात आलेली आहेत. पावसानेच हुलकावणी दिल्यामुळे आता भातपेरणी करायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. तालुक्यात भात, ऊस, रताळी, बटाटा, भुईमूग, नाचणी, सोयाबीन आदी प्रामुख्याने पिके घेतली जातात. तालुक्यातील मुख्य पीक हे भात आहे. काही मोजक्याच शिवारामध्ये धूळवाफ पेरणी केलेली आहे. हवामान खात्याने पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, गेल्या दोन चार दिवसापासून केवळ ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पण पाऊस हुलकावणी देऊ लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी तालुक्याच्या काही भागात केवळ पावसाचा शिडकावा झाला. पावसाने अशीच दडी मारली तर खरीप पिके घेणे कठीण जाणार आहे.
रताळी लागवडीसाठीही पावसाची गरज
तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक रताळी पीक घेण्यात येते. रताळ्यांसाठी शिवारामध्ये बांध, मेरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने तयार केल्या आहेत. रताळी लागवडीसाठीही पावसाची गरज आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे पुन्हा शेतकरी वर्ग निराश झाला आहे. पावसाअभावी विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. गावातील तलाव, नदी- नाले कोरडे पडलेले आहेत. बऱ्याच गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आता मान्सून दाखल होणे गरजेचे आहे.









