आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून किल्ल्याची पाहणी : पाणी, रस्त्याचीही सोय करणार
वार्ताहर /नंदगड
नंदगड गावच्या पश्चिमेला डोंगरावर असलेल्या आनंदगड किल्ल्यावरील स्वयंभू दुर्गादेवी मंदिर परिसरात सोलार दिवे बसविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी आमदार हलगेकर यांनी आनंदगड किल्ल्यावरील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. श्री दुर्गादेवी यात्रोत्सव कमिटीतर्फे कमिटीचे अध्यक्ष खेमाणी पाटील यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार केला. त्यानंतर आमदारांना स्वयंभू दुर्गादेवीचे मंदिर, आनंदगड किल्ला, विहीर व अन्य ऐतिहासिक स्थळे दाखविण्यात आली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व ओळखून लागलीच येथे दहा सोलार दिवे बसवून मंदिर परिसरात व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
नंदगड गावापासून आनंदगड किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. हा रस्ता करावा अशी मागणी श्री दुर्गादेवी यात्रा कमिटीच्यावतीने आमदारांकडे करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत खडीकरणाचा रस्ता बनवून देणार असल्याचे आश्वासन आमदारांनी यावेळी दिले. मंदिर परिसरात पाण्यासाठी कूपनलिका खोदण्यात आली आहे. या कूपनलिकेला दोन एचपी मोटर बसवून मंदिर परिसरात पाण्याची सोय केली जाणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत लैला साखर कारखान्याचे संचालक चांगाप्पा निलजकर, कार्यकारी संचालक सदानंद पाटील व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्गादेवी यात्रा कमिटीचे खेमाणी पाटील, लक्ष्मण पाटील, किरण चन्नेवाडकर, इराप्पा पाटील, आबा बेळगावकर, अनिल भिवरे, राजेंद्र लक्केबैलकरसह अनेकजण उपस्थित होते.









