वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
पंजाबची महिला धावपटू तसेच राष्ट्रीय विक्रमवीर मंजू राणीने येथे सुरू असलेल्या आंतरराज्य राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 35 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान मंजू राणीला शुक्रवारी या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा पार करता आली नाही.
पंजाबच्या 24 वर्षीय मंजू राणीने महिलांच्या 35 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत 3 तास, 21 मिनिटे आणि 31 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र फेरीची ठेवलेली 2 तास 58 मिनिटे 30 सेकंदाची मर्यादा मंजू राणीला पार करता आली नाही. गेल्या फेब्रुवारी महिन्यात रांची येथे झालेल्या स्पर्धेत या क्रीडा प्रकारात मंजू राणीने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
हरियाणाच्या जुनेद खानने पुरुषांच्या 35 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवताना 3 तास, 37 मिनिटांचा अवधी नोंदवला. मात्र त्याला आशियाई स्पर्धेसाठीची 2 तास, 35 मिनिटांची मर्यादा पार करता आली नाही. या स्पर्धेत महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत चार महिला धावपटूंनी आशियाई स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा 52.96 सेकंदाची पार केली. या क्रीडा प्रकारात हरियाणाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीमध्ये हरियाणाची अंजली देवी, तामिळनाडूची व्ही. रामराज्य, हरियाणाची हिमांशी मलिक आणि महाराष्ट्राची ऐश्वर्या मिश्रा यांनी या क्रीडा प्रकारात आशियाई स्पर्धा पात्रता मर्यादा ओलांडली आहे. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत केरळचा मोहमद अजमलने नव्या स्पर्धा विक्रमासह अंतिम फेरी गाठली आहे. तसेच केरळच्या मोहमद अनासनेही या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत ओडिशाच्या अनुभवी श्रीबानी नंदाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत तिने 11.69 सेकंदाचा अवधी नोंदवला. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत कर्नाटकाच्या ज्योती एराजीने अंतिम फेरी गाठली आहे.









