गुजरातमधील पडझडीनंतर राजस्थानमध्ये अलर्ट, दिल्ली परिसरातही जोरदार वारे
आपत्ती निवारण प्राधिकारण, राज्य सरकारांनी आधीच उपाययोजना केल्याचा लाभ
वृत्तसंस्था / गांधीनगर
अतितीव्र ‘बिपरजॉय’ वादळाचा जोरदार तडाखा गुजरातच्या सागरतटीय भागांना बसला आहे. मात्र, आधीच आवश्यक ती उपाययोजना केल्याने जीवितहानी टाळण्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारला यश आले आहे. मालमत्तेची हानी मात्र झाली असून अनेक घरे, वीजेचे खांब, झाले आणि काही बांधकामे धाराशायी झाली आहेत. 1 हजार गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यानंतर आता चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकले आहे. राज्यात अलर्ट जारी करून एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे. आता चक्रीवादळाचा जोर ओसरत असला तरी दिल्लीसह आजुबाजुच्या परिसरात शुक्रवारी दिवसभर वाऱ्याचा प्रभाव वाढला होता.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा हे वादळ गुजरातच्या सागरतटीय प्रदेशाला धडकले. यावेळी सोसाट्याचा वारा आणि प्रचंड पाऊस यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. एक लाखांहून अधिक नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. 2 लोक मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त होते. तथापि, त्यांचा मृत्यू अन्य काही कारणांमुळे वादळ होण्यापूर्वीच झाला होता, असे आपत्ती निवारण प्राधिकारणाने शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट केले.
वादळ राजस्थानकडे
गुजरातच्या सागरतटाला आदळून हे वादळ नंतर सौम्य होत राजस्थानकडे सरकले. तथापि, तोपर्यंत त्याची विनाशक शक्ती शांत झाली होती. त्यामुळे नंतर फारशी हानी झाली नाही. वादळामुळे गुजरात, राजस्थान, मुंबईसह दिल्लीलाही पावसाचा तडाखा बसला. गुजरातच्या आठ तटीय जिल्ह्यांमध्ये अद्यापही जोरदार पाऊस होत आहे. इतरत्र त्याने विश्रांती घेतली आहे.
मालमत्तेची हानी
या वादळात 1000 हून अधिक खेड्यांचा वीजपुरवठा तुटला असून तो शनिवारपर्यंत सुरळीत करण्यात येणार आहे. समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. एक हजारहून अधिक घरे पडली असून काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. समुद्रतटानजीची दुकाने, हॉटेले इत्यादींची हानी झाली आहे. वीजेचे खांब आणि झाले उन्मळून पडली असून खांब पूर्ववत करण्यात येत आहेत. 3,580 खेड्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
सर्वाधिक हानी जामनगरमध्ये
जामनगर जिल्ह्यात मालमत्तेची सर्वाधिक हानी झाली. त्यामुळे आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सर्वाधिक तुकड्या याच जिल्ह्यात आता नियुक्त करण्यात आल्या आहेत. तथापि, जीवितहानी न झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही परिस्थितीची माहिती कळविण्यात आली आहे.
अद्यापही जोरदार वारे
वादळग्रस्त भागातील वाऱ्यांचा जोर कमी झाला असला तरी तो जाणविण्याइतपत मोठा आहे. विशेषत: पोरबंदर, मुंद्रा, देवद्वारका, गांधीधाम आणि इतर काही स्थानी वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे अद्याप घर सोडलेले लोक परतलेले नाहीत. त्यांना आणण्याची व्यवस्था शासनाने केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
260 मार्ग मोकळे
वादळात अनेक झाडे पडल्याने मार्ग बंद झाले होते. असे 260 मार्ग आपापर्यंत वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. 1 हजाराहून अधिक वीजेचे खांबही पूर्ववत करण्यात आले आहेत. साडेतीन हजारहून अधिक खेड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात येत आहेत.
झोपड्यांची दुरुस्ती
वादळात 300 हून अधिक झोपड्यांची हानी झाली आहे. 53 झोपडल्या पूर्णपणे नष्ट झाल्या. राज्य शासनाने त्यांची दुरुस्ती करण्याचे कार्य हाती घेतले असून ते येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच सुरक्षितस्थळी पोहचलेले नागरिक आपापल्या घरी परतण्यास प्रारंभ झाला आहे.