एलओसीवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला : मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे-उपकरणेही जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
लष्कराने शुक्रवारी पहाटे उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडत पाच विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर संपूर्ण नियंत्रण रेषेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. लष्कराने सर्व फील्ड कमांडर्सना दहशतवाद्यांच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी 13 जून रोजी लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी पाच विदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागात पहाटेच्यावेळी कारवाई सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जण मारले गेल्याची माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.
सुरक्षा यंत्रणांना गुऊवारी दुपारी दहशतवाद्यांचा एक गट पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरमधून घुसखोरी करू शकतो, अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे लष्कराने घुसखोरीच्या दृष्टिकोनातून कुपवाड्यातील नियंत्रण रेषेवरील संवेदनशील भागात सतर्कता वाढवली होती. गुऊवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास जामगुंडमधील नियंत्रण रेषेच्या पुढील बाजूने गस्त घालत असलेल्या एका पथकाला स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांचा एक गट भारताच्या दिशेने येताना दिसला. त्याचवेळी परिसरातील सर्व चौक्मया आणि नाक्यावरील जवानांना सतर्क करत दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुऊवात झाली. दहशतवादी भारतीय हद्दीत घुसताच जवानांनी त्यांना आव्हान देत आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, दहशतवाद्यांनी मागे पळण्याचा प्रयत्न करतानाच जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. मध्यरात्री जवळपास 1.15 च्या सुमारास सुरू झालेली ही चकमक पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती. सूर्योदयानंतर जवानांनी सावधपणे पुढे जाऊन चकमकीच्या ठिकाणी शोध घेतला असता तेथे पाच दहशतवाद्यांचे मृतदेह आणि त्यांच्याकडील साहित्य सापडले.
चकमकीत मारले गेलेले सर्व दहशतवादी विदेशी असून त्यांचा लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित असल्याचे काश्मीर रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली उपकरणे आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे गेल्या तीन दिवसांत घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी 13 जून रोजी कुपवाडा जिह्यातील सीमा भागात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. कुपवाडा जिह्यातील डोबनार माचल भागात (एलओसी) भारतीय सेना आणि कुपवाडा पोलिसांची कारवाई अजूनही सुरू आहे.









