या आषाढ महिन्यात सगळं चराचरात जणू पालखीला चालल्यासारखं दिसायला लागतं. ती सगुण साकार मूर्ती पाहायला वारकरी धावतच असतात. असेच एक वारकरी ज्यांना संत भानुदास असं म्हणतात. त्यांची ही कथा. असेच ते एकदा आषाढीला पालखीबरोबर निघाले आणि तिथे आल्यानंतर त्यांना त्या जागी विठ्ठलाच्या मूर्तीत चैतन्य दिसेना. एकदा पंढरपूरचा एक कीर्तनकार चार पैसे कमावण्याच्या दृष्टीने दक्षिणेकडे निघाला. दक्षिणेकडे जाताना तो कीर्तनकला सादर करायचा, गाणे म्हणायचा आणि भजनात दंग व्हायचा. त्याची कीर्ती विजयनगरच्या राजापर्यंत पोहोचली. त्यांनी या कीर्तनकाराला आपल्या इथे बोलावलं. त्याचा आदर सत्कार केल्यानंतर त्यांनी त्यांची कुलदेवता त्याला दाखवली. विचारताच कुलदेवतेचे नाव रासाई सांगितलं. तिला पाहिल्यानंतर कीर्तनकार म्हणाला, मी हिला कुठेतरी पाहिलेय. मग आठवलं, पंढरपूरच्या देवळाचा आवार झाडायला, सडा रांगोळी करायला जे गंधर्व किन्नर येतात त्यांच्याबरोबर ही देवतासुद्धा असतेच. पांडुरंगाची भक्त असलेली ही देवता. राजाला हे उत्तर रुचलं नाही आणि त्यांनी ताबडतोब मला पंढरपूरला घेऊन चल आणि जर मला तशी अनुभूती आली नाही तर मात्र मी तुला फासावर देणार. राजा दुसऱ्या दिवशी हत्तीवर बसून पंढरपूरकडे निघाला. पंढरपूरला आल्यानंतर त्या कीर्तनकारांना पंढरीचे जे वर्णन केलं होतं ते साक्षात राजाला दिसू लागलं. देवळावरचे कळस सोन्याचे सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये लखलखत होते, साऱ्या शेतामधली हिरवीगार शेतं पाचूची भासत होती. हे सगळं पाहिल्यानंतर राजाने कीर्तनकाराला साष्टांग दंडवत घातला. पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर त्याला मनोमन आनंद झाला आणि त्यांनी तिथेच देवाची सेवा करायला सुरुवात केली. त्याच्या सेवेने पांडुरंग प्रसन्न झाला आणि काय हवं ते माग म्हणाला, राजाने विठ्ठलालाच आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. विठ्ठलाने मान्य केली पण राजाला अट घातली, मला नेशील तिथे एकाच जागी ठेवायचं आणि माझ्या भक्तांना त्रास होईल असं कधीही वागायचं नाही. राजांनी सगळं कबूल केलं आणि विठ्ठलासोबत विजयनगरला निघाला. तिथे त्यांनी त्याच्यासाठी भव्य राजवाडा अलंकार, वस्त्र, राजोपचार त्यासाठी सज्ज ठेवले. इकडे एकादशीला आलेल्या भानुदासांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते देवाला घ्यायला चालत चालत थेट विजयनगरपर्यंत आले. प्रचंड दागिने असलेला देव भरजरी वस्त्रांनी नटलेला. देवाने भानुदासांना पाहिलं, त्यांना तिथे थांबायची विनंती केली. सर्व सेवक झोपल्यानंतर भानुदास मंदिरात गुपचूप आले, देवाची गळाभेट घेतली. भानुदासांच्या गळ्यात देवाचा रत्नजडित हार तुळशीमाळेसोबत आल्याचे लक्षात आले नाही. भानुदास देवळाबाहेर येऊन नदीच्या किनारी नामस्मरणात दंग झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी देवाच्या पूजेची तयारी करू लागले तेव्हा गळ्यात रत्नजडित हार नसल्याचे समजले. राजाने सैन्य धाडलं आणि हाराची शोध सुरु झाली. तो भानुदासांच्या गळ्यात होता, त्यांना फरपटत देवळापर्यंत आणलं. आता साक्षात विठ्ठल उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की राजा मी तुला वचन दिलं होतं. अट घातली होती, की माझ्या भक्तांना त्रास होणार नाही असं तू बघ. आज माझ्या फक्तावरती हा चोरीचा आळ आला आणि त्याला त्रास झाला. त्यामुळे आता मी इथून निघणार. आता राजा केविलवाणा झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शेवटी राजांनी विनंती केली, की निदान माझ्या राज्यातला कानडी वेश तुम्ही धारण करा आणि विठ्ठलाने कानडीवेश धारण केला. सगळे वारकरी पालखीसह आता पंढरपुराकडे परत निघाले होते आणि विठ्ठल भगवंत पुन्हा पंढरपुरात आले होते. असे भक्त ज्या विठ्ठलाला लाभले त्या भक्तीचा महिमा आपल्याला केवळ या पालखीच्या वेळीच लक्षात येतो.
Previous Articleकल्याण ज्वेलर्सचा समभाग चमकला
Next Article चैतन्याची वारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.