एल निनोचा प्रभाव या मान्सूनमध्ये कधी ना कधी पडणार असे हवामान तज्ञ आणि राजकीय हवामान तज्ञही सांगायचे. तसेच घडले. मान्सून रत्नागिरीतच रखडला. पुणे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच त्याचे बाष्प गुजरातकडच्या चक्रीवादळाने काढून घेतले आणि विदर्भात उष्णतेची लाट आली…! राजकारणातही तेच घडले फक्त सत्तेवरच्या नेत्यांना लगाम आणि फेविकॉल लावण्यात आला!!
एक दिवस सकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे छायाचित्र असणारी जाहिरात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही ते अधिक लोकप्रिय असल्याचा उल्लेख वाचायला मिळेल असे कोणाच्या ध्यानीमनीही आले नसेल. पण ते घडले. राजकीय एल निनोचा हा प्रभाव. तोपर्यंत फक्त मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती. जोडीने दिल्ली वारीही झाली. तिथे काहीतरी झाले म्हणतात.
अब्दुल सत्तार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संदिपान भुमरे यांना हटवल्याशिवाय नवा विस्तार होणार नाही असा संदेश केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिला गेला. त्यामुळे मुंबईच्या समुद्रात उकळ्या फुटल्या. निकटवर्तीयांमधून कुजबूज वाढली. मग हितचिंतक खर्चात पडले! राजकीय एल निनोमुळे आधीच भाजपचा मान्सूनसुध्दा अडलेला आहे. रत्नागिरीत अडलेल्या मान्सूनप्रमाणेच राजकारणातील चक्रीवादळाने सगळा बाष्प काढून घेतला. मान्सूनला पश्चिम महाराष्ट्रावर बरसत पुणे, मुंबई करत मध्य महाराष्ट्र, विदर्भ गाठून सर्वव्यापी व्हायचे आहे! पण गतवर्षी सत्तेने ओढ दिली असताना अतिपूर्वेला गुवाहाटीतून वादळी वारे गोव्यात उतरले आणि महाराष्ट्रात सत्तेची बरसात झाली. भाजपच्या मान्सूनला सत्तेच्या चक्रीवादळाने रेटत उपमुख्यमंत्री पदावर बसवले. त्यातून वर्षभर मनावर दगड ठेवल्याने निर्माण झालेली वाफ अनिल बोंडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर या भरलेल्या पण बरसू न शकलेल्या ढगातून उतरली. बेडूक कधी हत्ती होईल का? महाशक्ती नसती तर तुमची काय हिम्मत? असे डिवचले गेले. दुसऱ्या बाजूने गजानन कीर्तीकारांनी आपल्या 40 ढगांना फुगवण्याचा प्रयत्न केला.
चाळीस आमदारांनी आपल्या शक्तीची जाणीव ठेवावी. आपण बाहेर पडलो, उद्धव ठाकरे यांना पदावरून घालवले म्हणून ते सत्तेवर आले आहेत. त्यांनी साथ दिली तरी आपल्या धाडसामुळे अशक्य ते शक्य झाले आहे. न डगमगता एकजूट ठेवावी. हे बोल मीडियापर्यंत पोहोचवले गेले. यादरम्यानचा काळ देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील अघोषित बहिष्काराचा होता. मुळातच शासन आपल्या दारी हा उपक्रम एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आमदारांच्या मतदारसंघातच किंवा जिह्यातच घेण्यात आला आणि त्यामुळे बहुतांश वेळा फडणवीस त्यास हजर नव्हते. कोल्हापूरला न जाण्याचे कारण त्यांनी कान दुखी सांगितले आणि तीन दिवस विश्रांती जाहीर केली. इकडे या जाहिरातीने उडालेली गडबड आणि मुख्यमंत्री पुत्रांची झालेली दिल्लीवारी यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक सामोपचाराची जाहिरात आली. यश दोघांचे आहे असे म्हणत आदल्या दिवशीचाच दावा पुन्हा केला.
तिसरा दिवस पालघर दौऱ्याचा होता जिथे ‘सर्व आमचे’ ही भाजपची भूमिका आहे. हेलिकॉप्टरचा एकत्र प्रवास करून सुद्धा पहिली दहा मिनिटे व्यासपीठावर शेजारी बसलेले दोन्ही नेते एकमेकांशी बोलले नाहीत. नंतर मैत्रीच्या आणाभाका आणि इतक्याशा वादाने हा मजबूत जोड तुटणार नाही असे सांगितले गेले. दोघांनी एकमेकाला लोकप्रिय म्हटले! वाद कायम ठेवून वादळ अपेक्षेप्रमाणे पेल्यात शमवले! ज्याचा ‘तरुण भारत’ने वाद सुरू झाला तेव्हाच उल्लेख केला होता. गुजरातचे हे चक्रीवादळ नेमके कुठे आणि कसा तडाखा देणार ते भविष्यात समजेल. पण चर्चा आहे ती फडणवीस यांना दिल्लीत पाठवले जाईल आणि दिल्लीतून तावडे किंवा कोणालातरी इथे आणले जाईल.
मराठाप्राधान्य हे राज्याच्या राजकारणात सूत्र ठेवायचे तर शिंदेंना, तावडेंना की काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या कोणा मराठा नेत्याला पुढे करणार ही चर्चा उठली. जी फक्त आस लावणारी आहे. फडणवीस यांना बाजूला करणे इतकेही सोपे नाही. त्यांनी स्वपक्षात खूप विरोधक कमवले असतील. पण, बाहेरून आणलेले तालेवार घराण्याचे नेते, सामान्य रयत मराठा नेते आणि गावगाड्यातील छोट्या जातीतून जमवलेल्या चुणचुणीत युवा आमदारांच्या फळीला त्यांच्याशिवाय पक्षात राखण्याचे, त्यांचा उपद्रव सोसण्याचे मोठे आव्हान आहे. ज्यांचे शेपूट सरकारी दगडाखाली आहे ते बंड सोडा पण साधा आ सुध्दा वासणार नाहीत. पण इतरांचे तसे नाही.
कर्नाटकात पक्षाने ती चव चाखली आहे. त्यामुळेच मान्सूनमधील बाष्प जसे चक्रीवादळाने काढून घेतले तशी स्थानिक नेतृत्वाची स्थिती असली तरी मतांचा पाऊस कोण पाडून देईल याची चाचपणी करत दोन्ही नेत्यांना लगाम घालण्याचे काम करण्यात आले आहे. भविष्यात शिंदेंची उपयुक्तताही पुन्हा तपासली जाईल. भाजप तेवढा प्रॅक्टिकल पक्ष आहे. जे घरात थांबले नाहीत त्या बावनकुळे, तावडे यांना त्यांनी चाल दिली. ज्या थांबून राहिल्या त्या मुंडे भगिनींना पर्याय दिले. आता त्यांनी महाराष्ट्रात नेतृत्वाअंतर्गत स्पर्धा लावली आहे.
एल निनोच्या प्रभावाने अशी सतत चक्रीवादळे येत राहणार. त्याची एकतर यांना सवय केली पाहिजे, किंवा बचावाचे मार्ग शोधले पाहिजेत! राज्याच्या राजकारणात त्यामुळे भविष्यातील घडामोडींची उत्सुकता वाढलेली आहे. कोण कोणाच्या बरोबर उभे राहणार आणि शक्तिशाली तंबू कोणाचा असणार हेही लवकरच दिसू लागेल. एकनाथ शिंदे यांनी आपला इरादा तर प्रकट केला आहे. त्यांच्या मागे महाशक्ती आहे का आणि ते पुढे काय करणार आहेत हे लवकरच समजेल. हवामान शास्त्रज्ञ मात्र यंदा मान्सूनला अधून मधून ओढ लागेल असे सांगत आहेत….यावेळी वादळ सक्रिय झाले तेव्हा विदर्भात वाढलेला उष्मा आणि मुंबईत समुद्राला उधाण दिसले. मध्य महाराष्ट्र गप्पच होता! तिथे सहकार सम्राट असतात….
शिवराज काटकर








