योजना आखण्यावर भर : कंपनीचे संस्थापक सुहास राजकुमार यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप सिंपल एनर्जी पुढील तिमाहीत दोन नवीन ई-स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे संस्थापक सुहास राजकुमार यांनी ही माहिती देताना सांगितले की, या ई-स्कूटर्सची किंमत ग्राहकांसाठी ‘आकर्षक’ स्वरुपात असणार आहे.
राजकुमार यांनी सांगितले की, कंपनी आपल्या प्रस्तावित 100 दशलक्ष डॉलर निधी उभारणी योजनेअंतर्गत कमी किमतीच्या ई-स्कूटरद्वारे विद्यमान गुंतवणूकदारांनाच टिकवून ठेवू शकणार नाही, तर ती संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास देखील सक्षम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कंपनीने गेल्या महिन्यात आपली पहिली प्रीमियम ई-स्कूटर सिंपल सादर केली, ज्याची किंमत 1.45 लाख रुपये आहे. 7 जूनपासून कंपनीने बेंगळूरूमध्ये टप्प्याटप्प्याने या स्कूटरचा पुरवठा सुरू केला आहे. सिंपल वनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजकुमार यांनी सांगितले की, कमी किमतीची ई-स्कूटर लॉन्च करणे हा कंपनीच्या पुढील तीन वर्षांत तीन स्कूटरचा पोर्टफोलिओ ठेवण्याच्या योजनेचा एक भाग राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय, कंपनी पुढील तीन वर्षांत एक परफॉर्मन्स बाईक आणि शक्यतो चारचाकी वाहन सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









