मराठी व इंग्रजीतील 75 हजार पुस्तकांचा संचय
प्रतिनिधी / फोंडा
अक्षरग्रंथ पुणे या संस्थेचे मराठी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य ग्रंथप्रदर्शन फोंडा शहरात भरविण्यात आले असून ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ व लेखक कमलाकर साधले यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन झाले. फोंडा अग्नीशामक केंद्रासमोरील श्री झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर सुर्लकर व अक्षरग्रंथचे राजेश खेडेकर हे उपस्थित होते.
वाचन हे माणसाच्या विचारांना समृद्ध बनवते व चांगली पुस्तके लोकांपर्यंत पोचण्यासाठी अशी ग्रंथप्रदर्शने भरविणे गरजेचे आहे. आजचा माणूस मोबाईल या तंत्रज्ञानाच्या आधीन झालेला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या संशोधकांनी हे उपकरण निर्माण केले, त्यांनाच आता या गोष्टीची चिंता वाटू लागली आहे. यावर उतारा म्हणजे नवीन पिढीला वाचन संस्कृतीकडे वळविणे, असे कमलाकर साधले यावेळी बोलताना म्हणाले.
या ग्रंथप्रदर्शनात मराठीतील बहुतेक नामवंत प्रकाशन संस्थाची व लेखकांची विविध विषयांवरील हजारो पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध साहित्यिकांच्या कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, नाटक या बरोबरच ललित साहित्यावर आधारीत पुस्तकांचा समावेश आहे. चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, विज्ञान, राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, पर्यटन, पर्यावरण, धार्मिक व बालसाहित्यही आहे. मराठीतील सर्वकाळ वाचल्या जाणाऱ्या नामवंत लेखकांची नव्याने प्रकाशित झालेले पुस्तके या प्रदर्शनात वाचकांना खरेदी करता येतील. मराठी व इंग्रजी मिळून साधारण 75 हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्याये व वाचनालयांना पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वा. यावेळेत हे ग्रंथप्रदर्शन खुले राहणार आहे.