करवीर तालुक्यातील कांचनवाडी गावातील क्रांती सागर कांबळे या मुलीने आपल्या तीन भावंडांचा पाण्यात बुडताना जीव वाचवल्याची घटना घडली आहे. क्रांतीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असून तिच्या या धाडसाचे कांचनवाडीसह पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, करवीर तालुक्यातील कांचनवाडी येथील क्रांती सागर कांबळे ही आपल्या वडिलांसोब जनावरे धुण्यासाठी तुळशी नदीला गेली होती. त्यावेळी तिच्याबरोबर आराध्या आणि माहेश्वरी या तिच्या दोन बहिणी आणि श्रवण हा भाऊ होता. तिचे वडिल जनावरे धुण्यात गुंतले होते. नदिच्या काठावर बसलेली आराध्याचा पाय निसरल्याने ती पाण्यात पडली तिच्याबरोबर माहेश्वरी आणि श्रवण हेही पाण्यात पडले. मंगळवारी तुळशी नदिच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. समयसुचकता दाखवून क्रांतीने आपल्याजवळील टॉवेल त्या मुलांच्या दिशेने फेकला आणि एकेकाला आपल्याकडे ओढून घेतले. पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.