खानापूर नगरपंचायतीच्या निधीतून तसेच लोकवर्गणीतून विकासकामे पूर्ण
खानापूर : नवीन पुलाजवळ उभारण्यात आलेल्या मोक्षधाम स्मशानभूमीतील इमारत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी 30 वर्षापूर्वी लोकवर्गणीतून बांधण्यात आले आहे. या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार केलेल्या शवदाहिन्या समाजकंटकांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. या स्मशानभूमीतील रस्ता, विद्युत व्यवस्था नव्हती. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मोरे, प्रमोद दलाल, रामा बहादूर, निलेश सडेकर, हणमंत हट्टीकर यासह इतर कार्यकर्त्यांनी मोक्षधाम दुऊस्ती केली आहे. तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी बाक व इतर सुविधा निर्माण केल्या. अंत्यविधी करण्याच्या कठड्यांच्या लोखंडी गजांची चोरी झाली होती. त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र थाट करण्यासाठी लागणारा निधी जमवणे शक्य नसल्याने हे काम थांबवण्यात आले. नगरपंचायतीने त्वरित लक्ष घालून मोक्षधाममधील इमारतीच्या थाटाची दुऊस्ती करावी, तसेच अंत्यविधीसाठी आणखी दोन कठडे उभारावेत, अशी मागणी होत आहे. याशिवाय शेडमधील दोन शवदाहिन्यांच्या बाजूने बिडाचे आवरण घालण्यात आले होते. यामुळे अंत्यविधीसाठी लाकडाचा खर्चही कमी येत होता. पण काही समाजकंटकांनी बिडाचे बार कापून चोऊन नेल्याने या दोन्ही ठिकाणी नव्याने बेड काँक्रीट घालून मोठे बिडाचे गर्डर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करणे सोयीचे होणार असून या ठिकाणी कमी लाकूड लागणार आहे. यासाठी 25 हजार रु. खर्च आला असून लोकवर्गणीतून हे काम केले आहे. तसेच स्मशानभूमीच्या जागेत नगपंचायतीच्या निधीतून पेवर्स घालून रस्ता बनविण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या गटारीचे काम करण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन विजेचे खांब उभारुन विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली स्मशानभूमीची देखभाल करावी
स्मशानभूमीतील पाण्याची टाकीही फुटून गेली होती. त्या ठिकाणी नवी पाण्याची टाकी उभारल्याने पाण्याची सोय करण्यात आली आहे. हे मोक्षधाम 30 वर्षापूर्वी गावातील समाजसेवकांनी पुढाकार घेऊन बांधले होते. याची देखभाल नगरपंचायतीने करणे गरजेचे होते. यासाठी हे मोक्षधाम नगरपंचायतीकडे हस्तांतर करणे गरजेचे होते. मात्र नगरपंचायतीने मोक्षधाम हे अद्याप हस्तांतर करून न घेतल्याने मोक्षधामाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होतो. वेळोवेळी काही समाजसेवक पुढाकार घेऊन याची देखभाल व डागडुजी करत आहेत. त्यामुळे कायमस्वरुपी याची देखभाल होणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीने मोक्षधाम हस्तांतर करून घेणे गरजेचे आहे. सत्तेवर असलेल्या नगरसेवकांनी तसा ठराव संमत करून मोक्षधाम नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली घेऊन त्याची देखभाल करावी, अशी मागणी होत आहे.









