नागरिकांनीच त्या प्रतिमांची योग्यतऱ्हेने विल्हेवाट लावणे हितावह
वार्ताहर /उचगाव
देवदेवतांच्या प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवून भक्तिभावाने रोज त्यांची पूजा, अर्चा, आरती केली जाते. आणि त्याच प्रतिमा अखेर दुखावल्या अथवा जीर्ण झाल्या किंवा नकोशा वाटल्या म्हणून कोठेतरी रस्त्याच्या कडेला ठेवून देणे हीच हिंदूधर्मियांची भक्ती आहे का? असे कृत्य करणे हिंदूधर्मियांना शोभनिय आहे का? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. उचगावजवळील मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरील गणेश मंदिराच्या शेजारी औदुंबरचा मोठा वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाजवळ अनेक देवदेवतांच्या प्रतिमा भाविकांनी अशाच ठेवून दिलेल्या आहेत. अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला एखाद्या वृक्षाच्या खाली, मंदिराजवळ, दगडावर ठेवून देणे हे अशोभनीय आहे, असे अनेकांचे मत आहे. यासाठी नागरिकांनी ज्यावेळेला आपल्या देवघरातील देवदेवतांच्या प्रतिमा दुखावल्या असतील, जीर्ण झाल्या असतील किंवा नकोशा वाटत असतील तर त्यांची विल्हेवाट त्यांची त्यांनीच लावली पाहिजेत. अशाप्रकारे देवतांच्या प्रतिमेचे प्रदर्शन मांडणे हे आपल्या हिंदूधर्मियांना अशोभनीय आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी आपल्या हिंदूधर्मीय बांधवांनी असे प्रकार थांबवावेत, अशी विनंती मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरील गणेश मंदिर कमिटीने केली आहे. यावेळी मधु बेळगावकर, एन. ओ. चौगुले, पुंडलिक पावशे, अशोक चौगुले यांनी सर्व जनतेला अशाप्रकारे देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना करू नये, असे आवाहनही केले आहे.









