न वापरलेली औषधे 80 टक्के जनता टाकून देत असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न
बेळगाव : डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी बरीच औषधे नंतर टाकून द्यावी लागतात. त्यामुळे दुकानदारांनी किंवा औषध उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना नको असलेली औषधे एक महिन्यापर्यंत पुन्हा परत घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे जनतेचे मत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये 80 टक्के लोक न वापरलेली औषधे टाकून देतात, असे निष्पन्न झाले आहे. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने हे सर्वेक्षण केले. औषधे टाकून देण्याचे मुख्य कारण म्हणजे औषध दुकानदार गरजेपेक्षा अधिक औषधे देतात, अशी तक्रार आहे. परंतु, डॉक्टर जितकी औषधे लिहून देतात तितक्याच प्रमाणात आपण औषधे देतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, यालाही नागरिकांचा आक्षेप असून डॉक्टरनी जरी तीन ते चार गोळ्या लिहून दिल्या असल्या तरी विक्रेता संपूर्ण स्ट्रीप घेण्याची सक्ती करतो. आवश्यक तेवढ्या औषधांची गरज संपल्यानंतर ही औषधे टाकून द्यावी लागतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. जवळ जवळ दोन हजार लोकांचे सर्वेक्षण केले असता 48 टक्के लोकांनी असे सांगितले की, आम्ही विकत घेतलेल्या औषधांच्या 10 टक्के औषधे नंतर वापराशिवाय किंवा कालबाह्या झाल्यामुळे फेकून देतो. 16 टक्के लोकांनी आपण 10 ते 50 टक्के औषधे फेकून देतो, असे स्पष्ट केले.
अशा पद्धतीने वापराविना फेकून दिलेल्या औषधांमुळे पर्यावरणाला मात्र मोठा धोका उद्भवतो आहे. औषधांमधील घटकांमुळे पाणी आणि माती यांचे पर्यावरण धोक्यात येत आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. औषध विक्रेत्याने पूर्ण स्ट्रीप घेण्याची सक्ती करू नये, असेही मत पुढे आले असून ऑनलाईन खरेदीदारांचेसुद्धा असेच म्हणणे आहे. डॉक्टरसुद्धा गरजेपेक्षा जास्त औषधे लिहून देतात, अशी तक्रार काही जणांनी नोंदविली आहे. 28 टक्के लोकांना असे वाटते की, औषध विक्रेत्याने आणि ई-फार्मासीजने रुग्णाच्या गरजेनुसारच औषधे द्यावीत. अतिरिक्त औषधे शिल्लक राहिली तर ती परत घ्यावीत. ग्राहकाला एक महिन्याच्या आत औषधे परत करण्याची सुविधा मिळाली पाहिजे, असे 40 टक्के लोकांना वाटते. 24 टक्के लोकांनी असे करण्याची गरज नसून अतिरिक्त औषधे हॉस्पिटलना परत करण्याची सुविधा सुरू होणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, असेही नमूद करण्यात आले.
औषधी गोळीच्या मात्रेचे प्रमाण…
बऱ्याचशा औषधी गोळ्यांवर मध्ये एक रेष किंवा बारीक खाच मारलेली आढळते. या खाचेचा किंवा रेषेचा नेमका अर्थ काय? हे बऱ्याच रुग्णांना किंवा सर्वसामान्यांना माहीत नसते. जर आपण घेत असलेल्या गोळीवर अशी खाच असेल तर त्याचा अर्थ आपण ती गोळी संपूर्ण घेण्याऐवजी अर्धी अर्धी घेऊ शकतो.









