एस.एस. राजामौली यांची घेणार भेट
वृत्तसंस्था/ हैदराबाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुरुवारी चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली यांची भेट घेणार आहेत. राजामौली हे ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली’ या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. गृहमंत्री शाह हे गुरुवारी हैदराबादपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावरील खम्माम येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
राजामौली तसेच राज्यातील अन्य काही प्रमुख व्यक्तींना अमित शाह भेटणार आहेत. शाह यांचा तेलंगणा दौरा हा भाजपच्या महा जनसंपर्क मोहिमेचा हिस्सा असल्याची माहिती तेलंगणा भाजपचे प्रवक्ते एन.व्ही. सुभाष यांनी दिली आहे. हैदराबाद येथून गृहमंत्री अमित शाह हे हेलिकॉप्टरद्वारे भद्राचलम येथे पोहोचतील आणि तेथील श्रीराम मंदिरात पूजा करणर आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर शाह हे जाहीर सभेत सामील होणार आहेत.
जाहीर सभा आटोपल्यावर शाह हे विजयवाडा येथे पोहोचणार आहेत. तेलंगणात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्तारुढ बीआरएस समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सध्या सुरू आहे. शाह यांनी मार्च महिन्यात अभिनेता राम चरण आणि त्यांचे वडिल तसेच तेलगू सुपरस्टार चिरंजीवी यांची भेट घेतली होती.









