स्वत:वरील आरोप नाकारले : कागदपत्रे बाळगणे अधिकार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ मियामी
गोपनीय दस्तऐवज घरी नेण्याप्रकरणी आरोपी असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी दुपारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा) मियामी येथील न्यायालयासमोर हजर राहिले. सुमारे 45 मिनिटांपर्यंत चाललेल्या सुनावणीदरम्यान ट्रम्प यांनी स्वत:वरील सर्व आरोप नाकारले आहेत. सुनावणीनंतर ट्रम्प यांनी बेडमिंस्टर गोल्फ क्लब येथे पोहोचून समर्थकांना संबोधित केले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षाने स्वत:च्या शक्तीचा गैरवापर केला आहे. अध्यक्षपदावर बसलेल्या एका भ्रष्ट नेत्याने खोट्या आरोपांच्या आधारावर स्वत:च्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला अटक करविली, प्रत्यक्षात हा अध्यक्ष स्वत: तसेच अनेक माजी अध्यक्ष याप्रकरणी दोषी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

मला गोवण्यात आले
मी सर्वकाही प्रक्रियेनुसार केले होते, तरीही माझ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. माझ्यावर हेरगिरी कायद्याच्या अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या कायद्याचा वापर हेर अन् देशद्रोह्यांच्या विरोधात होतो. माजी अध्यक्ष म्हणून या फाइल्स स्वत:सोबत घेऊन जाण्याचा मला कायदेशीर हक्क आहे. अध्यक्ष जो बिडेन, बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांनीही अशाप्रकारचे गोपनीय दस्तऐवज स्वत:सोबत नेले होते असा आरोप ट्रम्प यांनी केला.
सुनावणीनंतर वाढदिवस साजरा
सुनावणीनंतर ट्रम्प यांना घरी जाण्याची अनुमती मिळाली होती. न्यायालयातून बाहेर पडताच ते एका क्यूबन रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी समर्थकांसोबत स्वत:चा वाढदिवस साजरा केला आहे. तर ट्रम्प उपस्थित राहणार असल्याने मियामी न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रम्प यांचे हजारो समर्थक न्यायालयाबाहेर दाखल झाले होते.
पासपोर्ट बाळगता येणार
न्याय विभागाने ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्याचा पासपोर्ट जमा करवून घ्यावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळली आहे. ट्रम्प आणि त्यांचे सहकारी वॉल्ट नाउटा यांना पासपोर्ट जमा करण्याची गरज नसल्याचे न्यायाधीशांनी स्वत:च्या आदेशात म्हटले आहे.









