व्यवस्था त्वरित सुधारण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
पणजी : महापौर रोहित मोन्सेरात यांनी मंगळवारी शहरातील भाजी मार्केटसह मासळी मार्केटला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी कचरा आणि अस्ताव्यस्थता पाहून त्यांनी संताप व्यक्त केला व सर्व व्यवस्था त्वरित सुधारण्याचे आदेश संबंधितांना दिले. मोन्सेरात यांच्यासमवेत त्यावेळी उपमहापौर संजीव नाईक, बेन्तो लॉरेन्स, अभियंते विवेक पार्सेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. भाजी मार्केट परिसरात पाहणी करतेवेळी अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्थ टाकलेला दिसून आला. त्यावर संताप व्यक्त करताना महापौरांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या भेटीदरम्यान त्यांनी व्यापाऱ्यांच्या अडी अडचणीही समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मासळी मार्केटमध्ये भेट देऊन तेथील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता दिसून आली. गटारव्यवस्था सुरळीत नसल्याचेही जाणवले. तसेच मार्केटचे छप्पर अनेक ठिकाणी फुटलेले असून पावसाचे पाणी थेट विक्रेत्यांच्या अंगावर पडत आहे. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती असेल तर पुढे आम्ही काय करावे? असे सवाल विक्रेत्यांनी उपस्थित केले. या सर्व समस्या व अडचणींवर येत्या पाच दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी त्यांना दिले व त्यासंबंधी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिले.









