ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष
सांबरा : बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली असून कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. गावातील कचऱ्याची उचल करण्यासाठी तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणतीही उपाययोजना न राबविल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. गावच्या प्रवेशद्वाराजवळच बेळगाव-बागलकोट रोडच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला आहे. अनेक दिवस हा कचरा पडून राहिल्याने साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होणार असून वास्तविक पाहता पावसापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायतीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने कचरा समस्या गंभीर बनत चालली आहे.
जिल्हा पंचायतीने लक्ष देणे गरजेचे
बेळगाव तालुक्यातील जवळजवळ सर्वच ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरा गाडी असून प्रत्येक घराला डस्टबिनही पुरविण्यात आली आहेत. मात्र येथे ही योजना अजून राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे साहजिकच गावात कचरा समस्या निर्माण झाली आहे. तरी जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावची पाहणी करून गावातील कचरा समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









