यंदाच्या हंगामात वाढणार रताळी लागवड क्षेत्र : बटाटा लागवडीत घट होण्याची शक्यता
बेळगाव : उन्हाळी रताळी काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवाय दरदेखील 400 ते 500 रुपये क्विंटलवर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा उन्हाळी हंगामात रताळी वेल लागवड क्षेत्र वाढले होते. सुरुवातीला रताळ्याला समाधानकारक भाव मिळाला. मात्र आता दर गडगडले आहेत. काही भागात अंतिम टप्प्यात रताळी काढणी सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम भागात पावसाळी रताळी वेल लागवड व उन्हाळी रताळी लागवड क्षेत्रदेखील वाढू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच उत्पादनही वाढले आहे. पावसाळी रताळ्यांना समाधानकारक दर मिळाला होता. त्यानंतर उन्हाळी रताळी वेल लागवड वाढली होती. उन्हाळी रताळ्यांना सुरुवातीच्या काळात दर मिळाला. मात्र अंतिम टप्प्यात दर घसरला आहे. मे महिन्यात प्रति क्विंटल 800 रुपयांपर्यंत दर होता. आता 400 ते 500 रुपयापर्यंत खाली आला आहे.
रताळ्यांना 1500 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर
तालुक्यातील बेळवट्टी, बिजगर्णी, बैलूर, तुरमुरी, अतिवाड, बेकिनकेरे, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, जाफरवाडी, अलतगा, कल्लेहोळ, कुद्रेमनी, कंग्राळी खुर्द आदी भागात उन्हाळी रताळी वेल लागवड करण्यात आली होती. यापैकी बहुतांश गावातील रताळी काढणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात बटाटा लागवड कमी झाली असून त्याऐवजी रताळी वेल लागवड केली जात आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात रताळ्यांचे उत्पादन वाढू लागले आहे. पावसाळी रताळ्यांना 1500 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातदेखील रताळी वेल लागवड क्षेत्र वाढणार आहे.
शतेकऱ्यांना फटका
पश्चिम भागात विशेषत: रताळी वेल लागवड होणार आहे. बैलूर, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळगुंदी, बडस, गोल्याळी, बाची, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, कल्लेहोळ, कुद्रेमनी, बेकिनकेरे, अतिवाड, कर्ले, राकसकोप भागात रताळी वेल लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र बटाटा लागवडीत घट होण्याची शक्यता आहे. बटाटा उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे.
खरीप हंगामात रताळी लागवड वाढणार
यंदाच्या खरीप हंगामात रताळी वेल लागवड क्षेत्र वाढणार आहे. यासाठी जमिनीची मशागतदेखील केली जात आहे. रताळी वेल लागवडीसाठी बांध लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेषत: लाल जमिनीत रताळी वेल लागवडीला पसंती दिली जाते. त्यामुळे कुद्रेमनी, बेळवट्टी, बडस, बैलूर आदी भागात जास्त प्रमाणात लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.









