सहा मुलींचा तर दोन मुलांचा समावेश : 19 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा, खेळाडू भोपाळला रवाना
बेळगाव ; मध्यप्रदेश भोपाळ येथे 66 व्या स्कूल गेम ऑफ फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) च्या अखिल भारतीय 19 वर्षाखालील मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात बेळगावच्या आठ खेळाडूंची निवड झाली. या निवड झालेल्या संघात गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा मुचंडी व इस्लामिया पदवीपूर्व महाविद्यालयाचा मोहमद फैजान खान यांची निवड झाली आहे. तर मुलींच्या गटात लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सायली देसाई, तन्वी गावडे, धनश्री कदम, समृद्धी कुडची तर गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाची वेदिका बुवा, जेएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाची निशा घाडी यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडू बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व करताना उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची कर्नाटक राज्य फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत मंगळूर विभागाने विजेतेपद तर बेळगाव जिल्हा संघाने उपविजेतेपद पटकावले. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी वरील सर्व 8 खेळाडू बेंगळूरमार्गे भोपाळला रवाना झाले आहेत. या सर्व खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, विनय नायक, खलील कोतवाल, डॉ. अमित जडे, डॉ. रामराव यांचे मार्गदर्शन लाभले.









