वृत्तसंस्था/ पॅरीस
सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने गेल्या रविवारी फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकत आपल्या 23 वे ग्रँडस्लॅम अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला होता. या कामगिरीमुळे एटीपीच्या ताज्या मानांकनात जोकोविचने पुन्हा अग्रस्थान हस्तगत केले आहे.
फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जोकोविचने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुडचा पराभव केला होता. यापूर्वी एटीपीच्या मानांकनात स्पेनच्या कार्लोस अॅलकॅरेझने अग्रस्थान मिळवले होते. दरम्यान फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत 36 वर्षीय जोकोविचने उपांत्य सामन्यात अॅलकॅरेझचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत रशियाच्या कॅरेन कॅचेनोव्हने पहिल्या दहा खेळाडूमध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे. जोकोविचने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर टेनिस क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. त्याने 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. तसेच त्याने वर्षभरातील होणारे चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा (विम्बल्डन, अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन) जिंकल्या आहेत. असा पराक्रम करणारा जोकोविच हा दुसरा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी म्हणजे 1969 साली ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेव्हरने चारही ग्रँडस्पर्धा जिंकण्याचा पराक्रम पहिल्यांदा केला होता.









