वृत्तसंस्था/ कोची
आयसीसीची 2023 सालातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. सदर स्पर्धेतील काही सामने थिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयसीसीतर्फे या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. दरम्यान या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील दोन किंवा तीन सामने थिरुवनंतपुरममध्ये खेळवण्याची शक्यता असल्याचे समजते. बीसीसीआय आणि केरळ क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबरमधील होणाऱ्या सामन्यावेळी पावसाचा अडथळा येण्याची शक्यात असल्याने हे सामने ऑक्टोबर महिन्यात थिरुवनंतपुरम येथे कदाचित आयोजित केले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. थिरुवनंतपुरममध्ये सामने निश्चित झाले तर त्यापैकी भारत-लंका यांच्यातील सामना कदाचित येथे खेळवला जाईल. थिरुवनंतपुरममध्ये या स्पर्धेतील सामने आयोजित करण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसून केरळ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या निर्णयाची वाट पाहात आहेत.
भारताने आतापर्यंत आयसीसीची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा तीनवेळा यशस्वीपणे भरविली आहे. पण त्या तिन्ही स्पर्धांमध्ये केरळला एकाही सामन्याची संधी मिळाली नव्हती. थिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या गेल्या 8 वर्षांच्या इतिहासामध्ये केवळ 5 आंतरराष्ट्रीय सामने भरविली गेली आहे.









