, मे महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू हॅरी टेक्टर, थिपाचा पुथवाँग
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यामध्ये क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर आणि थायलंडची महिला क्रिकेटपटू थिपाचा पुथवाँग यांची अनुक्रमे मे महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून जाहीर करण्यात आले. आयसीसीचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारा हॅरी टेक्टर हा आयर्लंडचा पहिला क्रिकेटपटू असून त्याने नवा इतिहास घडवला आहे. तसेच थायलंडची महिला क्रेकेटपटू पुथवाँगने आयसीसीचा हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा जिंकून नवा पराक्रम केला आहे.
आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टरने अलीकडच्या महिनाभराच्या कालावधीत आपल्या फलंदाजीत सातत्य राखले आहे. वनडे क्रिकेट प्रकारामध्ये टेक्टरकडून सातत्याने दर्जेदार फलंदाजी झाल्याने आयसीसीच्या पुरुषांच्या फलंदाजांच्या वनडे मानांकनात टेक्टरने सातवे स्थान मिळवले आहे. मे महिन्यात आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील मालिका आयर्लंडमध्ये खेळवली गेली. सदर मालिका आयसीसीच्या सुपर लिग अंतर्गत होती. आयर्लंडने या मालिकेत आपला व्हाईटवॉश टाळू शकला नाही. व्हाईटवॉश टाळला असता तर आयर्लंडला चालू वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली असती. तथापि या मालिकेत पहिल्या सामन्यात टेक्टरने नाबाद 21 धावा जमवल्या होत्या. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात टेक्टरने 10 षटकारांच्या मदतीने 113 चेंडूत 140 धावा झळकवल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये टेक्टरची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टेक्टरच्या कामगिरीमुळे आयर्लंडला 319 धावापर्यंत मजल मारता आली होती. बांगलादेशविरुद्धची ही मालिका गमवल्याने आयर्लंडला आता आयसीसीच्या पुरुषांच्या आगामी भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पात्रतेसाठी झिंबाब्वेत होणाऱ्या पात्रता स्पर्धेमध्ये खेळावे लागणार आहे. सदर स्पर्धा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मे महिन्याच्या कालावधीत टेक्टरने 206 धावा जमवल्या होत्या. आयसीसीने टेक्टरची मे महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड केल्याबद्दल आयर्लंड क्रिकेट मंडळाने आयसीसीचे आभार मानले असून टेक्टरचे अभिनंदन केले आहे. या मासिक पुरस्कारासाठीच्या शर्यतीमध्ये बांगलादेशचा नजमुल हुसेन शांतो, पाकचा बाबर आझम यांचा समावेश होता. बांगलादेशच्या नजमुल हुसेन शांतो हा आयसीसीच्या 2022 च्या कालावधीतील सर गारफिल्ड सोबर्स चषकाचा मानकरी आहे.
मे महिन्यातील सर्वोत्तम हिला क्रिकेटपटूचा पुरस्कार थायलंडच्या थिपाचा पुथवाँगने पटकावला आहे. आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही पुथवाँगने मिळवला होता. सलग दोनवेळा आयसीसीचा हा पुरस्कार पटकावून पुथवाँगने नवा इतिहास घडवला आहे. थायलंड महिला संघातील डावखुरी वेगवान गोलंदाज पुथवाँगने मे महिन्यात झालेल्या चार टी-20 सामन्यात 1.54 धावांच्या सरासरीने 11 गडी बाद केले होते. कंबोडियामध्ये मे महिन्यात झालेल्या दक्षिण पूर्व आशियाई स्पर्धेत पुथवाँगने दर्जेदार कामगिरी केली. फिलिपिन्सविरुद्धच्या टी-20 सामन्यात पुथवाँगने 3 धावात 4 गडी बाद केले होते तर त्यानंतरच्या पुढील सामन्यात तिने मलेशियाचे 3 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर म्यानमारविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पुथवाँगने 2 धावात 3 गडी बाद केले होते. 19 वर्षीय पुथवाँगने या स्पर्धेमध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 11 गडी बाद करण्याच्या विक्रम नोंदवला. या पुरस्काराबद्दल पुथवाँगने आयसीसीचे आभार मानले आहे.









