घरबसल्या होतेय मोठी कमाई
प्रत्येक माणसाला स्वत:साठी एक सुंदर घर हवे असते. कमी किमतीत काही प्रमाणात आलिशान अन् मोठे घर मिळाल्यास प्रत्येक जण ते खरेदी करू पाहणार आहे. एका ब्रिटिश जोडप्याने स्वत:च्या घराच्या किमतीत फ्रान्समध्ये जात पूर्ण गावच खरेदी केले आहे.
फ्लॅटच्या किमतीत त्यांनी पूर्ण गाव कसे खरेदी केले हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. पश्चिम इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या जोडप्याला ही ऑफर मिळाली आणि त्यांनी ही ऑफर स्वीकारली. मँचेस्टरमध्ये असलेला स्वत:चा 3 बेडरुम असलेला फ्लॅट त्यांनी विकला आणि फ्रान्समधील पूर्ण गाव खरेदी केले आहे.

3 कोटी रुपयांमध्ये पूर्ण गाव
रेडिओ इंडस्ट्रीत काम करणारे जोडपे लिझ आणि डेव्हिड मर्फी यांनी स्वत:चे घर 4 कोटी 14 लाख रुपयांमध्ये विकले होते, त्यांचा हा फ्लॅट 3 बेडरुम्सचा होता, यातील 3 कोटी रुपये खर्च करून या जोडप्याने एक छोटेसे गाव खरेदी केले आहे. या गावात सुमारे 400 वर्षे जुनी घरं होती. आता त्यांनी स्वत:च्या कुटुंबीयांना या गावात वसविले आहे. तसेच स्वत:च्या दोन्ही मुलांसोबत येथे ते राहण्यासाठी आले आहे. या गावातील इमारतींच्या डागडुजीकरता त्यांना मोठी मेहनत अन् पैसा खर्च करावा लागला आहे.
शांतता अन् व्यवसाय
या गावातील काही घरांमध्ये स्वत: राहायचे आणि उर्वरित घरांचे नुतनीकरण करत त्यांना हॉलिडे होम्स म्हणून भाडेतत्वावर देण्याचा या जोडप्याचा विचार आहे. यातून त्यांना सहजपणे लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. हे जोडपे स्वत:ची नोकरी आणि मुलांना वेळ देता येत नसल्याने आनंदी नव्हते. अशा स्थितीत त्यांनी येथे येण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्यांना येथून कधीच परतू नये असे वाटत आहे. घरांसोबत येथे मोठी जागा तसेच स्वीमिंग पूल देखील आहे. येथील वास्तव्य त्यांना स्वस्त तसेच समाधान देणारे वाटत आहे.









