अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, जे जन्मतात आणि स्वत:चा उद्धार होण्यासाठी काहीही न करता नाश पावतात ते रिकाम्या हातानेच परत जात असल्याने त्यांना पुन: पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातून फिरावे लागते. ते सर्व असंत होत. म्हणून सर्व गोष्टींची आसक्ती सोडून उदास होऊन, विरक्तपणे जीवन व्यतीत करावे. आसक्ती म्हणजे काय ते नीट समजून घे. मनुष्य स्वत:ला कर्ता समजून प्रपंचातली कर्तव्ये पार पाडत असतो. साहजिकच त्याला केलेल्या कर्तव्य कर्मातून फळाची अपेक्षा असते. ती पूर्ण झाली नाही की तो दु:खी होतो किंवा अपेक्षित फल मिळाले की तो सुखी होतो पण मुळात प्रपंचच तात्पुरता असल्याने सुख दु:खही तात्पुरतेच असते. ही गोष्ट लक्षात न घेता मनुष्य त्यातच गुंतून पडतो. ह्यालाच आसक्ती म्हणतात. तो जर मी कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे असे म्हणेल तर त्याला कर्मफलाची अपेक्षा राहणार नाही. तेव्हा ईश्वराला कर्ता मानून आपण आसक्ती सोडून उदास, विरक्तपणे जीवन व्यतीत करावे. ज्यांना कुणाला त्यांचा नश्वर देह वाढल्यावर आनंद होतो ते मूर्ख समज. कारण त्यांची समज वाढलेली नसल्याने, त्यांना मनुष्य जन्माचे रहस्य समजलेच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. ते माणसाच्या उत्पत्ती आणि विनाशातून काहीच शिकत नाहीत. म्हणून तुला उत्पत्तीविनाशलक्षण समजावून सांगतो. ऐक, उद्धवा आपण समोर दिसणाऱ्या व्यक्तींच्या जन्ममृत्युचे साक्षीदार असतो. ह्यावरून आपण अनुमान काढू शकतो की, जे जे समोर दिसतंय ते ते नाश पावणारे आहे. अगदी मेरू पर्वतासारखे मोठमोठे आकारसुद्धा प्रलयाच्यावेळी नष्ट होतात. ह्याच अर्थाने वेद किंवा श्रुती असं सांगते की, समोर दिसणारी ही सर्व अष्टधा प्रकृती आहे ना, तीही एक ना एक दिवस नाश पावणारी आहे. आपला प्रत्यक्षातला अनुभवही असाच आहे. जे जड आहे, विकारी आहे ते आज ना उद्या नष्ट होणार! पण गंमतीदार गोष्ट अशी आहे की, वडील गेलेले मनुष्य पाहतो, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो पण देहभोगामुळे स्वत:च्या मृत्यूची चिंता कधीही करत नाही. मुले वडिलांना उत्तम गती मिळावी म्हणून पिंडदान देतील, त्यांना उतम गती मिळण्यासाठी प्रार्थना करतील पण आपण जर आत्मोद्धारासाठी काही प्रयत्न केले नाहीत तर आपली गत काय होईल ह्यावर कधी विचार करत नाहीत. आत्मा हा एकच केवळ प्रकाशघन असून प्रपंच जड मूढ आणि अज्ञानी मंडळींनी भरलेला आहे. थोडक्यात भगवंताना असं म्हणायचं आहे की, माणसाची अवस्था कळतंय पण वळत नाही अशी असते. संसार, स्वत:ची बायकामुले आणि स्वत:चा देह ह्यांच्या प्रेमात तो इतका गुरफटून गेलेला असतो की, आपला देह नश्वर आहे, आपणही कधी ना कधी मरणार आहोत, असा प्रश्न त्याला कधी पडत नाही. आपल्या मृत्युनंतर आपल्याला कोणती गती मिळेल ह्या गोष्टीबाबत तो कधी विचार करेल अशी वेळच येत नाही मग सद्गती मिळावी म्हणून काही कृती करण्याची गोष्ट तर लांबच राहीली. भगवंतांच हे बोलणं ऐकून उद्धवाच्या लक्षात आले की, मनुष्य संसारातच गुरफटून गेल्यामुळे भवबंधनात अडकतो. म्हणजे स्वत:ला कर्ता समजून तो करत असलेल्या कर्मामुळे पाप किंवा पुण्य निर्माण होते आणि ते भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसं बघितलं तर मनुष्य शरीर निर्जीव असतं पण आत्म्याकडून चैतन्य प्राप्त झाल्याने ते सजीव होते. ह्या सगळ्यावर विचार करून उद्धवाने त्याला पडलेला प्रश्न भगवंताना विचारायचे ठरवले. तो म्हणाला, देवा तू सांगितल्याप्रमाणे आत्मा तर तुझाच अंश असल्याने तो तुझ्याप्रमाणेच नित्यमुक्त चिद्घन असतो. त्यामुळे त्यास भवबंधन लागू होत नाही. ह्यावरून एकच म्हणावंसं वाटतं की, सूर्य जर मृगजळाच्या डोहात बुडू शकला तरंच आत्म्याला भवबंधन लागू होईल पण हे अशक्य असल्याने आत्म्याला भवबंधन लागू नाही हे नक्की होय. हे झालं निर्जीव असलेल्या देहाबाबत, दुसरं म्हणजे देह बघायला गेलं तर देह ही निर्जीव वस्तू असते.








